Home Breaking News लॉयड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या माध्यमातून आदर्श ग्राम अभ्यास दौरा संपन्न

लॉयड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या माध्यमातून आदर्श ग्राम अभ्यास दौरा संपन्न

97

• लॉयड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या माध्यमातून आदर्श ग्राम अभ्यास दौरा संपन्न

सुवर्ण भारत: पंकज रामटेकें

चंद्रपूर: लॉयड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या माध्यमातून उसगाव मुरसा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि विविध बचत गटांमधील महिलांसाठी नुकताच आदर्श ग्राम मंगी आणि कुकूडसाथ येथे एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात सहभागी सदस्यांनी आदर्श गावांमध्ये यशस्वीपणे राबवलेल्या विकास योजनांची प्रत्यक्ष माहिती घेतली आणि त्यातून प्रेरणा घेतली.
या अभ्यास दौऱ्यात उसगाव मुरसा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावातील महिला बचत गटांमधील सक्रिय महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांनी आदर्श ग्राम मंगी आणि कुकूडसाथ या गावांमधील पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, ग्राम स्वराज्य आणि सामुदायिक विकास कामांचे प्रत्यक्ष अवलोकन केले.
दौऱ्यादरम्यान, सहभागी महिलांनी दोन्ही आदर्श गावांच्या सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक महिला बचत गटांशी संवाद साधला. त्यांनी गावातील स्वच्छ पाणी पुरवठा योजना, सौर ऊर्जा वापर, घनकचरा व्यवस्थापन, गटारींचे नियोजन, निर्मित ऑक्सिजन पार्क, वृक्षारोपण आणि बचत गटांमार्फत चालवले जाणारे लघुउद्योग यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायतीच्या कामकाजात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि लोकसहभागातून गावाचा झालेला विकास यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
लॉयड्स इंफिनाईट फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, “ग्रामीण विकासासाठी आदर्श गावांचे अनुकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे उसगाव मुरसा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि महिला बचत गटांना त्यांच्या गावातही अशाच प्रकारचे विकासाचे उपक्रम राबवण्यासाठी नवी दिशा व प्रोत्साहन मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.”
अभ्यास दौऱ्यातील सहभागी महिलांनी हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. एका महिला बचत गटातील सदस्या म्हणाल्या, “आदर्श गावांमध्ये प्रत्यक्ष पाहिल्यावर आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आता आम्ही आमच्या उसगाव,मुरसा गावातही असेच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू.”
या अभ्यास दौऱ्यामुळे उसगाव मुरसा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवीन अध्याय सुरू झाला असून, आगामी काळात आदर्श गावांच्या धर्तीवर अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे.