#gadchandur
• गडचांदूरमध्ये अवैध देशी दारू विक्रीविरोधात संतोष पटकोटवार यांची पोलिसांकडे तक्रार
सुवर्ण भारत: रविकुमार बंडीवार
प्रतिनिधी, गडचांदुर कोरपना
गडचांदूर :-– शहरातील काही देशी दारू विक्रेत्यांकडून नियमबाह्य पद्धतीने होलसेल दरात दारू विक्री सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पटकोटवार यांनी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
गडचांदूर शहरात अंदाजे पाच ते सहा देशी दारू विक्रीची दुकाने आहेत. या दुकानदारांकडे फक्त चिल्लर विक्रीचा परवाना असतानाही, काहीजण ठराविक लोकांना होलसेल दरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अवैध मार्गाने पैसा कमावण्याचा प्रकार सुरू असून, रात्री उशिरा आणि पहाटेही विक्री सुरू असल्याची तक्रार आहे.
संतोष पटकोटवार यांच्यासह माजी सरपंच चरणदास मेश्राम, बापुराव कलेगुरवार, पांडुरंग ईदे, विलास बाचले, गोपाल चांदेकर, सिकंदर बनसोड, निखिल कागणे यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन गडचांदूरचे थानेदार शिवाजी कदम आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
नियमबाह्य विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून, आर्थिक संकट ओढवले आहे. याशिवाय, आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर परिणाम होत असून, काही नागरिकांचा जीव गमावण्याचे प्रकार घडत आहेत.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित देशी दारू विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी एकमुखाने केली आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.


