Home Breaking News #Ghugus • घुग्घुस शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व आनंद मेळावा उत्साहात

#Ghugus • घुग्घुस शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व आनंद मेळावा उत्साहात

190

#Ghugus
• घुग्घुस शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व आनंद मेळावा उत्साहात

सुवर्ण भारत:पंकज रामटेके( सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)

घुग्घुस : आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त घुग्घुस शहरात महिला मेळावा तसेच आनंद मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले. तहसील कार्यालय परिसरासमोरील विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर तसेच अन्य महान महिला व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी सुपरवायझर कल्पना नगराळे होत्या, तर जनता कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्या सौ. सविता विनय बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मीना राजेश मोरपाका, वैशालीताई डवस, नितू चौधरी, सारिका इसारप, किरण बोढे आणि पुष्पा रामटेके मंचावर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.

महिला मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. महिलांनी संगीत व नृत्याच्या कार्यक्रमांद्वारे आपल्या कला सादर केल्या. नृत्य कार्यक्रमाचे नियोजन सौ. कोमल रामटेके व सुरेखा बहादुरे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना सौ. पूजा दुर्गम, सुचिता लुटे, सुनिता घिवे आणि सुनिता पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जागतिक महिला दिन हा केवळ महिलांचा सन्मान करण्याचा दिवस नसून महिलांना रोजगाराच्या संधी, समान हक्क आणि समाजातील सशक्त स्थान मिळवून देण्यासाठी कृतिशील राहण्याचा दिवस आहे.

या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील अनेक महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.