Jivti taluka @news
• जिवती तालुक्यात शेतजमीनीचे फेरफार ठप्प !
•तालुक्यातील समस्या तात्काळ सोडवा -अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू !
•तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीने दिला शासनाला इशारा
चंद्रपूर :किरण घाटे
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असणाऱ्या जिवती येथे मागील महिन्यात स्थानिक नागरिकांनी जिवती तालुका भूमिहीन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तब्बल नव दिवस आमरण उपोषण केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी एका बैठकीत झालेल्या चर्चे नुसार संपूर्ण मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.इतकेच नाही तर सहा महिन्याकरिता संयुक्त मोजणीच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांची नियुक्ती करण्याचे बैठकीत ठरले होते.
अजून पर्यंत त्याची नियुक्ती झालेली नाही. या शिवाय वारसान फेरफार सुरु केलेले नाही.तदवतच जातीचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे. जिवती येथील नवीन ग्रामीण रुग्णालय अद्याप ही सुरु झाले नाही या मागण्या जैसे थे असून मागण्यांची पूर्तता झाली नाही. संपूर्ण मागण्यांसाठी जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना नुकतेच एक लेखी निवेदन देण्यात आले आहे. उपरोक्त मागण्यांची पूर्तता न झाल्यास आगामी निवडणुकीवर तालुक्यातील जनतेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीचे नेते सुग्रीव गोतावळे,सुदाम राठोड,शबीर जहागीरदार,विजय गोतावळे,लक्ष्मण मंगाम, मुकेश चव्हाण, विनोद पवार, दयानंद राठोड, प्रेम चव्हाण यांनी दिला आहे .