•पत्रकारांनी सामान्य जनतेचा आवाज होणे आवश्यक – दिव्याताई भोसले
• गुणवंत विद्यार्थ्याचा अभिनंदन सोहळा तथा शैक्षणिक साहित्य वितरण
चिमुर :- भारतीय संविधानाने सर्वसामान्य जनतेला समान न्याय देण्याची तरतुद केली आहे. संविधानाने दिलेले अधिकार व हक्काची अंमलबजावणी शासन व प्रशासनाकडुन होतांना दिसत नाही. त्याकरिता पत्रकारांनी जनतेला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. लिहीण्याचा व बोलण्याचा पर्यायाने प्रश्न विचारण्याचा हक्क पत्रकारांना आहे. त्या हक्काचा योग्य वापर केल्यास एक स्वतंत्र ओळख निर्माण होवुन सकारात्मक काम केल्याचे समाधान मिळत असते. व्हॉईस ऑफ मिडीया हि संघटना सामान्य नागरिकांच्या समस्येसोबतच पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी काम करीत आहे. सकारात्मक पत्रकारिता करणा-यांचे प्रश्न शासन व प्रशासनाकडे व्हॉईस ऑफ मिडीयाने मांडले आहे. त्याला शासनाकडुन उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मिडीयाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्याताई भोसले यांनी केले.
व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा व तालुका चिमुरच्या संयुक्त विद्यमाने चिमुर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान सभागृहात आयोजीत पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा अभिनंदन सोहळा व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभात दिव्याताई भोसले बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मिडीयाचे राज्य संघटक तथा जेष्ठ पत्रकार सुनिल कुहीकर होते. तर विशेष अतिथी म्हणुन मंचावर चिमुरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, नगर परिषद चिमुरच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेन्द चांदे, श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष निलमभाऊ राचलवार, व्हॉईस ऑफ मिडीयाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे, व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद रेवतकर, रमेश कंचर्लावार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्रीहरी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हॉईस ऑफ मिडीया ज्या पंचसुत्रीवर काम करीत असते त्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून दिव्याताई भोसले पुढे म्हणाल्या की, व्हॉईस ऑफ मिडीया हि पत्रकारांची देशातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली संघटना म्हणुन नोंद झालेली आहे. या संघटनेचे जाळे आता आपल्या देशाबाहेर सुध्दा पसरले आहे. पत्रकारांच्या समस्येसाठी कृतीशील संघटना म्हणुन जनमान्यता मिळाली आहे असे विविध विषय हाताळत दिव्याताई भोसले यांनी मार्गदर्शन केले. अरविंद रेवतकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सकारात्मक व नकारात्मक पत्रकारीता करणा-यांची वर्गवारी करून पत्रकारीता क्षेत्र बदनाम का होत आहे? याबाबतची वास्तविकता विषद केली. अध्यक्षीय भाषणात सुनील कुहीकर यांनी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी व्हॉईस ऑफ मिडीयाची भुमिका, आज पर्यंतची प्रगती व भविश्यातील वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करतांना जिल्हयातील आजपर्यंतच्या यशस्वी व जिल्ह्यात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक चांदे, नीलम राचलवार यांनी यथोचित मार्गदर्शन केले.
यावेळी इयत्ता 10 व 12 वी च्या परिक्षेत प्राविण्य प्राप्त झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. तर सर्व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नागभीड येथील पत्रकार अरुण भोले यांचे अलीकडे निधन झाले होते, त्यांच्या कुटुंबियांना व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने रोख पाच हजार रुपये सानुग्रह म्हणून मदत देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्रीहरी सातपुते, प्रास्ताविक संजय पडोळे यांनी केले. उपस्थितांचे आभार गुरू गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हयातील पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी कंरण्याकरीता तालुका अध्यक्ष रामदास हेमके, सचिव भरत बंडे यांच्या मार्गदर्शनात पदाधिका-यांनी विशेष सहकार्य केले.