Rajura taluka @news
• अंतरगांव ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा निलेश खोब्रागडेंचा आरोप ; बांधकामाची चौकशी करा ग्रा.प.सदस्य खोब्रागडेंनी केली मागणी!
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
विरुर स्टे./राजुरा विशेष प्रतिनिधी- पंचायत समिती राजुरा अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथील ग्रामपंचायत नूतन इमारतीचे जनसुविधा योजनेअंतर्गत बांधकाम सुरू आहे. मात्र या इमारतीचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य निलेश खोब्रागडे यांनी केला आहे.
सदर इमारतीचे सुरू असलेले बांधकम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट व रेतीचे मिश्रण प्रमाण चुकीचे असल्याने संपूर्ण बांधकाम कच्या स्वरूपाचे झाले आहे. १३ जूनला सदर ग्रामपंचायतीचे स्लॅब टाकण्यात आले. मात्र त्याच रात्री आलेल्या तुरळक अशा हलक्या पावसाने या स्लॅब वरील सर्व मसाला निघाला असून फक्त बांधकामातील गिट्टी दिसत आहे. यावर सकाळी मजुरांनी डागडुजी केली. ग्रामपंचायत इमारत बांधकाम तसेच गावातील नाली व इतर बांधकामाची चौकशी करून सबंधित कंत्राटदारावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे केली आहे.
तेलंगणा सीमेलगत असलेल्या अंतरगाव ग्रामपंचायतीची इमारत नव्याने बांधण्यात येत आहे. या इमारतीचे बांधकाम खाजगी कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. या बांधकामात सिमेंटचा वापर कमी प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हलक्या पावसामुळे या बांधकामाचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे सदर इमारतीचे बांधकाम क्वालिटी ऑफ कंट्रोल ला बाजूला सारून करण्यात आल्याची हि पोचपावती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गोंधळ सावरण्यासाठी स्लॅब वर सिमेंट पाणी मारून पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न कंत्राटदाराकडून करण्यात आला आहे.
गावातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी नव्याने बांधकाम करण्यात आलेली सदर इमारत निकृष्ट दर्जाची असून शासनाच्या निधीचा चुराडा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर इमारतीचे बांधकाम नव्याने करून देण्याची मागणी केली जात आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य निलेश खोब्रागडे, सदस्या भावना लोखंडे, विठोबा लोणारे, सुदर्शन भोयर, सुभाष रासपल्ले, गुलाब रासपल्ले आदी ग्रामस्थांनी केली आहे. यावर होणाऱ्या कारवाई कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.