Home Breaking News विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती येथे श्री चक्रधर जयंती व शिक्षक दिन साजरा

विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती येथे श्री चक्रधर जयंती व शिक्षक दिन साजरा

37

विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती येथे श्री चक्रधर जयंती व शिक्षक दिन साजरा

सुवर्ण भारत ✍️राजेश येसेकर भद्रावती

भद्रावती (तालुका प्रतिनिधी): विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती येथे
दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोज गुरूवारला थोर तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक १८/०१/२०२४ परिपत्रकानुसार भाद्रपद शुक्ल व्दितीयेला भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय लांबट तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना ठावरी, आशा मते, संजय आगलावे व पुरूषोत्तम श्रीरामे होते. याप्रसंगी सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला.

शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वर्ग ५ ते १० मधील काही विद्यार्थ्यांनी आपले आवडते विषय शिकवून आपली चुणूक दाखवली. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देखील कार्यालय सांभाळून आपली भुमिका पार पाडली. याप्रसंगी महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ८०३ व्या अवतार दिनानिमीत्य महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्री चक्रधर स्वामी यांचे जीवनावर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लांबट सर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री चक्रधर स्वामी यांच्या विषयी माहिती सांगितली. ते म्हणाले डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे आमचे आदर्श असून त्यांचा वारसा आम्ही असाच पुढे चालवत राहू असे सांगितले तर श्री चक्रधर स्वामी यांनी समाजाला सर्वप्रथम अहिंसा धर्माची शिकवण समाजाला दिली.

प्रमुख पाहुण्या कल्पना ठावरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री चक्रधर स्वामी तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. पुरूषासोबतच स्त्रियांनाही ज्ञानाचा अधिकार सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींनी मिळवून दिला. “महंत राष्ट्र ते महाराष्ट्र” असा महाराष्ट्राचा सर्वप्रथम गौरव १२ व्या शतकात चक्रधर स्वामींनी केला असे विचार व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी सुध्दा सहभाग घेऊन महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या विषयी माहिती सांगितली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ८ वी ची विद्यार्थिनी किरण पिंपळकर हिने अतिशय छान पध्दतीने केले. तर आभारप्रदर्शन वर्ग ६ वी ची विद्यार्थिनी प्रतिक्षा झिंगरे हिने केले. कार्यक्रमाची सांगता आशा मते यांच्या श्री चक्रधर स्वामी आधारित सुरेल प्रार्थनेने झाली.