पुणे : सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून कोरोना नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.
पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्य विषयक सेवा-सुविधांमध्ये वाढ करा, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व दळवी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभा करावा. मनुष्यबळाअभावी शासकीय रुग्णालयात वापर होत नसलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी द्यावेत. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांची काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष द्या. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरण राबवा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कडक नियम पाळावेत, अन्यथा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.