Home Breaking News Chandrapur city@ news • आ.किशोर जोरगेवारांची मागणी – वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट...

Chandrapur city@ news • आ.किशोर जोरगेवारांची मागणी – वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करा ! • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी; सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी दिले आश्वासन

82

Chandrapur city@ news
• आ.किशोर जोरगेवारांची मागणी – वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करा !

• मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी; सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी दिले आश्वासन

चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून या अधिवेशनात सरकारकडून याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बाबत जनतेत मोठा रोष आहे. त्यामुळे जनतेला मान्य नसलेल्या या मीटर जोडणीची सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. आज मुंबई मंत्रालय येथे झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.
वीज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात असताना महाराष्ट्रात वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत.
शासनाच्या नवीन वीज कर धोरणानुसार सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडण्याची सक्ती करण्यात येत आहे. ग्राहकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्री-पेड वीज मीटर लावले जात आहेत. जुने वीज मीटर पोस्ट-पेड असल्याने ग्राहकांना थकीत बिल भरण्याची मुभा होती, त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार वीज देयक भरण्यास सक्षम होते. मात्र, स्मार्ट प्री-पेड वीज मीटरमुळे पुरेशा रिचार्ज अभावी वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.
रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास वाढणार आहे. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सरकारने नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिचार्ज मीटरच्या फायदे आणि तोटे यांचे निष्पक्ष मूल्यांकन करत, वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणी सक्ती रद्द करावी आणि लोकभावना लक्षात घेऊन पूर्ववत जुने वीज मीटर देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.