Home Breaking News Chandrapur city@ news • ज्येष्ठांचे संस्कारच समाजाचे आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार...

Chandrapur city@ news • ज्येष्ठांचे संस्कारच समाजाचे आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार •कार्यक्रमाला नायब तहसिलदार सचिन खंडारे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती

58

Chandrapur city@ news
• ज्येष्ठांचे संस्कारच समाजाचे आधारस्तंभ – आ. किशोर जोरगेवार
•कार्यक्रमाला नायब तहसिलदार सचिन खंडारे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती

चंद्रपूर:किरण घाटे

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनात अनेक आव्हाने पेलत आपल्याला जीवनाचे खरे अर्थ समजावून दिले आहेत. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे रत्न आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण प्रत्येक संकटावर मात करून पुढे चालत आलो आहोत. त्यांच्या अनुभवातून आणि सल्ल्यांतून आपण कधीही न संपणारी शिकवण मिळवली आहे. त्यांनी आपल्याला दिलेले संस्कार आणि मूल्ये आपल्या जीवनाचे शिल्पकार असून ज्येष्ठांचे संस्कारच समाजाचे खरे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि जिल्हा आरोग्य समितीच्या वतीने रामनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे शनिवारी १५ गावांतील ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, नायब तहसीलदार सचिन खंडारे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज भोयर, उपाध्यक्ष विजय पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दिपलता नारनवरे, गिरिजाबाई देवाडकर, सरपंच प्रतिभा अलवलवार, सरपंच निवेदिता ठाकरे, उपसरपंच निखिलेश चामरे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमास प्रशांत पुणेकर, शुभांगी तरेवार, मिनल मुधोळकर, अनुप नंदगिरवार, विराज घडसे, जगदीश राऊत उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या वतीने सुरू करण्यात आलेला “मायेची सावली” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हा उपक्रम चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण राबवावा, यासाठी सभागृह बांधण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ. चंद्रपूरात ऑक्टोबर महिन्यात होणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवात ९९९ ज्येष्ठ महिलांचा आपण सन्मान करू, असे ते यावेळी म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सोनेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत गीत सादर केले, तर जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार सचिन खंडारे यांनी यावेळी बोलताना वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजनांची माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली. डॉ. दिपलता नारनवर यांनी प्रास्ताविकेतून ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रमाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रपूर तालुका समन्वयक शुभांगी तरेवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनीही आपापले मनोगत व्यक्त करत आयोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांचे सामान्य ज्ञान, स्मरणशक्ती खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करण्यात आले. या मेळाव्यात येरूर, मार्डा, ताडाळी, वेंडली, घुग्घुस आणी मोरवा येथील ज्येष्ठ नागरिकांना बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला १५ गावांतील ४०० ज्येष्ठ नागरिक व स्वयंसेवक उपस्थित होते.