Home Breaking News Chandrapur dist@ News •राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे येत्या 9ऑगस्टला चंद्रपूरात निदर्शने!

Chandrapur dist@ News •राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे येत्या 9ऑगस्टला चंद्रपूरात निदर्शने!

278

Chandrapur dist@ News
•राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे येत्या 9ऑगस्टला चंद्रपूरात निदर्शने!

चंद्रपूर: किरण घाटे

जुन्या पेन्शनबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विनाविलंब अंमलबजावणीकरीता शासकीय कर्मचाऱ्यांचे येत्या ९ ऑगस्टला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने होणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर यांनी या प्रतिनिधीस आज दिली.

१४ डिसेंबर २०२३ रोजी विधानसभा अधिवेशनात, नागपूर मुक्कामी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जुना पेन्शन ज्या सुधारित स्वरुपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा ढाचा निवेदनाव्दारे विधानसभेच्या पटलावर ठेवला. त्यानुसार तत्संबंधातील अधिसूचना/शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु त्याबाबत शासन फारच “आस्ते कदम” दिसते. सदरची कार्यवाही सत्वर व्हावी यासाठी आंदोलनात्मक पाऊल उचलण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार, दिनांक 9 ऑगस्ट 2024 ला दुपारी 2.00 वाजता स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने करणार आहे.

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरण दि. १ मार्च २०२४ च्या प्रभावाने लागू केल्यासंदर्भांतील अधिसूचना/शासन निर्णय पारित न करणे व जिल्हा परिषद/शिक्षक यांचे बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न होणे तसेच प्रलंबित इतर मागण्यांचा देखील शासनास विसर पडलेला आहे.असे संघटनेचे म्हणणे आहे.

राज्य शासनाने आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत ठाम नकाराची भूमिका कधीही घेतली नाही, हे खरे आहे. परंतु, पेन्शनसारख्या संवेदनशील विषयात चालढकल तर होत नाही ना ? असे प्रश्नचिन्ह सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी-शिक्षकांच्या मनात उभे झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही प्रशासकीय कार्यवाहीतील अवरोध समजून घेतला आहे. परंतु ४ जून २०२४ नंतर शासनाने दिलेल्या वचनाचे प्राथम्याने पालन करणे आवश्यक होते. याबाबतच्या मंदगती कार्यवाहीमुळेच वेगवेगळ्या संशयाचे धुके अधिक गडद होऊ लागले आहे. त्यामुळे कर्मचारी- शिक्षकांमधील असंतोष दिवसागणिक वाढत चाललेला आहे.

 

आयोजित या निदर्शने कार्यक्रमास जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परीषद कर्मचारी, तसेच इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा द्यावा असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर, सरचिटणीस राजु धांडे, कार्याध्यक्ष संतोष अतकारे व अविनाश बोरगमवार, कोषाध्यक्ष श्रीकांत येवले यांनी केले आहे.