Chandrapur Dist News
• आ.किशोर जोरगेवारांनी केली दोन रुग्णांना आर्थिक मदत!
सुनिता कुंटावार व चिराग बेलेला दिली मदत !
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर: चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन रुग्णांना एकूण 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.
हिप रिप्लेसमेंट आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आता नागपूर येथे उपचार होणार आहेत. मदत मिळालेल्या रुग्णांमध्ये घुग्घूस येथील चिराग बेले (18) आणि चंद्रपूर येथील सुनिता कुंटावार यांचा समावेश आहे.
चिराग बेले या 18 वर्षीय युवकाला हिप रिप्लेसमेंट करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या कुटुंबाने आमदार जोरगेवार यांच्याकडे मदतीची मागणी केली. आमदार जोरगेवार यांनी तातडीने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून चिरागच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.
तसेच, चंद्रपूरच्या सुनिता कुंटावार यांचा अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागत होता. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीही आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.
आता दोन्ही रुग्णांवर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात योग्य उपचार होणार असून, त्यांनी आमदार जोरगेवार यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीही आमदार जोरगेवार यांनी मतदारसंघातील अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली आहे, ज्यामुळे त्यांना उपचार घेण्यासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळाला आहे.