• ऑटो रिक्षा चालकांनी विजयासाठी सहकार्य करावे
संवाद सेतू कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
आमदारकीच्या तीस वर्षाच्या कार्यकाळात अनेक संघटनांशी नाते निर्माण झाले, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना ही त्यातील एक प्रमुख संघटना. मी अर्थमंत्री असताना ऑटो रिक्षा चालककांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. हे महामंडळ आज स्थापन झाले आहे. प्रोफेशनल टॅक्स आकारणीचा विषय आला तेव्हा संसदीय संघर्ष करून तो प्रश्न सोडवला. ऑटो रिक्षा चालकांना अल्पदरात घरे उपलब्ध करून दिली. ऑटो रिक्षा चालक बंधू हा माझा परिवार आहे. या बंधूनी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मला सहकार्य करावे असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी आज संवाद सेतू च्या माध्यमातून ऑटो रिक्षा चालक मालकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, वाहन कर जेव्हा वाढला तेव्हा देखील मी ऑटो रिक्षा चालकांसाठी विधानसभेत संघर्ष केला व ते विधेयक मागे घेण्यास शासनाला भाग पाडले. चंद्रपूर बस स्थानकानजिक सर्व सुविधा युक्त ऑटो रिक्षा स्टॅन्ड मी निर्माण केले. बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा, चंद्रपूर येथील ऑटो रिक्षा चालकांना लाभ व्हावा या दृष्टीने शासनाच्या योजना मी येत्या काळात राबविणार आहे. आजवर ऑटो रिक्षा चालकांच्या समस्या सोडविताना मी कधी जात धर्म पंथ बघितला नाही. माझा परिवार म्हणून मी कायम तुमच्या सोबत राहिलो. आता मला तुमच्या साथीची, सहकार्याची आवश्यकता आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. या संवाद सेतू कार्यक्रमात ऑटो रिक्षा संघटनेचे राजेंद्र खांडेकर व अन्य पदाधिकाऱ्यांसह मोठया प्रमाणावर ऑटो रिक्षा चालक उपस्थित होते.