• नळजोडणी धारकाने थकीत बिल व मीटर काढून पाणी घेणाऱ्या ग्राहकांवर मनपा करणार दंडात्मक कारवाई
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर २८ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होऊन पाणी पुरवठा योजनेवरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर शहरास ईरई नदी व धरणावरून पाण्याची उचल करून,रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची गरज पाहता सध्या ४२ दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज करण्यात येते. अमृत योजना सुरु होण्यापुर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते, अमृत योजनेअंतर्गत त्यात वाढ होऊन ६२ हजार पर्यंत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत.परंतु त्या नळांना पाणी येत नसल्याची, कमी येत असल्याची किंवा पाण्याचे प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या.
तपासणी केली असता आढळुन आले कि अनेक ठिकाणी उगीच नळ सुरु ठेवणे, वाहने धुण्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणे अश्या निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत होता.सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते. मीटर लावण्यापूर्वी नळ जोडणी धारकांकडुन सरसकट वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता आणि तो सर्वांना सारखाच लागू होता.त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्येकाकडून केला जातो याचा अंदाज बांधणे कठीण होते. त्याने नागरिकांच्या आग्रहाखातर ‘ पाण्याचा जेवढा वापर तेवढेच देयक ‘ या सुत्रानुसार मनपाद्वारे खर्च करून घरोघरी मीटर बसविण्यात आले
५०,८९१ घरी मनपाद्वारे आतापर्यंत मीटर लावण्यात आले असुन यापैकी केवळ १४ टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहे. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असुन अप्राप्त देयकांमुळे संपुर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले आहे. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला लागुन असलेला पाईप काढला जातो ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते, मात्र मीटर बंद झाले असता कळुन येत असल्याने अश्या नागरिकांवर नळ कनेक्शन कपात व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पाणी कराची थकबाकी होत असल्याने पाणी पुरवठा करतांना येणार खर्च हा मालमत्ता कर उत्पन्न व इतर उत्पन्नातुन मनपाला भागवावा लागतो. त्यामुळे कराच्या बदल्यात ज्या सुविधा मनपातर्फे पुरविण्यात येतात त्यावरही परिणाम होऊ शकतो. जर अश्याच प्रकारे बिल न भरल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत राहिली तर मनपाला ही योजना चालविणे शक्य होणार नसल्याने सर्व नळजोडणी धारकांनी आपले देयक प्रामाणिकपणे भरण्याचे तसेच कुठेही मीटर बंद करू पाणी वापर सुरु असेल तर मनपाला कळविण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे