Home Breaking News गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षकावर काळाचा घाला विसापूर येथील ह्रदय हेलावणारी...

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षकावर काळाचा घाला विसापूर येथील ह्रदय हेलावणारी घटना : सेवानिवृत्ती नंतरही करत होते विद्यार्जन

520

• गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षकावर काळाचा घाला

• विसापूर येथील ह्रदय हेलावणारी घटना : सेवानिवृत्ती नंतरही करत होते विद्यार्जन

सुवर्ण भारत:वैभव मेश्राम (प्रतिनिधी बल्लारपूर)

विसापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या दहावीचा निकाल शुक्रवार ( दि.८ ) मे रोजी आनलाईन जाहीर झाला. यामध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घरोघरी जाऊन करण्यात येत होता.दरम्यान एका विद्यार्थीनीच्या घरी तिचा सत्कार करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. लगेच सहकारी शिक्षक वृंदांनी तातडीने त्यांना उपचारार्थ चंद्रपूर येथे दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. ही ह्रदय हेलावणारी घटना आज सांयकाळी ८ वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे घडली. विनायक महादेव काळे ( ६0 ) रा.तुकडोजी चौक,विसापूर असे अकाली मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.त्याच्या पश्चात पत्नी उमा,मुलगी सिद्धी व रिद्धी असा परिवार आहे.

बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे श्री. चिंतामणी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आहे. शाळेचा निकाल लागल्यावर गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्याची परंपरा आहे. याच अनुषंगाने आज सांयकाळी ७ वाजता शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत दोंतुलवार व अन्य शिक्षक वृंद गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी गेले.शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली लावण्या कैलास इंगोले हिचा सत्कार करण्यात आला. तिला पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान त्याच वेळी विनायक काळे यांची प्रकृती अस्वस्थ जाणवले. ते भोवळ येऊन खाली पडणार, तेवढ्यात सहकारी शिक्षकांनी त्यांना सावरले.विसापूर येथे प्रथमोपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलविले. मात्र वाटेतच त्यांनी प्राण त्यागले.

काही दिवसापूर्वी ते चिंतामणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. मात्र त्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होते. यामुळे त्यांची सेवा मानधनावर घेतली जात होती. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ते विद्यार्जन करत होते.ज्या विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक धडे दिले.त्यांनी गुणवत्ता सिद्ध केली. त्यांचा सत्कार करताना शिक्षकावर काळाचा घाला आला.यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक काळे हे धोबी,परिट,वरठी समाज मंडळाचे पदाधिकारी होते.