सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी उपक्रम
सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

बल्लारपूर : “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या उदात्त ध्येयाने प्रेरित समाजसेवी संस्था सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन क्लब, बल्लारपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचार व ध्येयधोरणांपासून प्रेरणा घेत हा उपक्रम चिंतामणी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विसापूर येथे उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे निशुल्क मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले. यामध्ये इयत्ता ५ वी मराठी माध्यमातील २५ विद्यार्थ्यांसाठी नवोदय परीक्षा, इयत्ता ७ वीतील १६ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता ८ वीतील ८ विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमत माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके वितरित करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षण हेच यशाचे खरे साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच “मी सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला चिंतामणी विद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत दंतुलवार, सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर तसेच शाळेचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सदस्य कमल वर्मा, सुधाकर सिक्का, विनोद कोवे, मनोज धामणगे, रितेश गुप्ता, मिलाप, आसिफ भाई, चुटकू भैय्या आदींनी विशेष परिश्रम घेत सक्रिय सहभाग नोंदविला.


