बल्लारपुरात अज्ञात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मार्गावरील स्लज गार्डन परिसरातील घटना
बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील स्लज गार्डन परिसरातील जंगलात एका अज्ञात युवकाने झाडाला प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना सदर युवक झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
मृत युवकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी एसएनडीटी कॅम्पस परिसर आणि आसपासच्या भागात शोध घेतला, परंतु उशिरापर्यंत त्याची ओळख पटू शकलेली नाही. घटनास्थळी तपासणी केली असता, मृत युवकाजवळ ‘विजयवाडा ते वाराणसी’ या मार्गाचे रेल्वे तिकीट मिळून आले आहे. या तिकिटाचा आधार घेऊन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहेत.
सध्या मृतदेह बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी बल्लारपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.








