लक्षवेधी / विशेष वृत्त
पंकज रामटेके
रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी वाढवा : गॅस हजाराच्या वर, १५०० रुपयात काय होणार? लाडक्या बहिणींना १५ हजार द्या!
चंद्रपूर : सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील चूलच महाग झाली आहे. घरातील सर्वात महत्त्वाचा असलेला गॅस सिलेंडर आता हजार रुपयांच्या वर गेला आहे. किराणा, भाजीपाला, तेल, पेट्रोल, औषधे, मुलांच्या शाळेची फी सर्वच महाग झाले आहे. या महागाईच्या आगडोंबात सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून मिळणारे १५०० रुपये अपुरे पडत असल्याने, रक्षाबंधनाची भेट म्हणून १५ हजार रुपये द्यावेत, या मागणीने *चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात जोर धरला आहे.
हजाराच्या वर गेला गॅस, संसार कसा चालवायचा?*
पूर्वी ४००-५०० रुपयात मिळणारा गॅस आज १००० ते ११५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे एकट्या गॅससाठीच १५०० पैकी १००० रुपये संपले. मग उरलेल्या ५०० रुपयात किराणा, भाजी, मुलांचे शिक्षण कसे भागवायचे? असा संतप्त सवाल गृहिणी करत आहेत.
– गॅस सिलेंडर : १००० रुपयांच्या वर
– खाद्यतेल डबा : १६०० रुपयांच्या पार
– तूरडाळ : १८०-२०० रुपये किलो
– भाजीपालाही ८० ते १०० रुपये किलो
लाडक्या बहिणींची आर्त हाक – सरकाराने लक्ष द्यावे
“सरकार आम्हाला लाडकी बहीण म्हणते, मग मोठ्या भावासारखे लक्षही द्यावे. हर वस्तू महाग झाली आहे. रक्षाबंधन काही दिवसांवर आले आहे. या सणाला भावाकडून ओवाळणी मिळते, तशीच सरकारकडूनही आम्हाला १५ हजार रुपयांची ओवाळणी द्यावी,” अशी मागणी महिलांमधून होत आहे.
त्यामुळे सरकारने रक्षाबंधनापूर्वी याचा गांभीर्याने विचार करून लाडक्या बहिणींच्या खात्यात १५ हजार रुपये जमा करावेत, अशीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.






