• आंतरजिल्हा चोरट्याला बल्लारपूर पोलिसांची अटक
• रेल्वे गोदामातील चोरीचा तपास; चौकशीत बल्लारपूरसह वर्धा, गडचिरोलीतील गुन्ह्यांची माहिती उघड
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : विसापूर येथील रेल्वेचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोदामातून लोखंडी अँगल, प्लेट, जॅक आदी साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या चौकशीत बल्लारपूरसह वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील चोरीच्या गुन्ह्यांची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
विसापूर येथील रेल्वे गोदामातून लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. तपासादरम्यान दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम (२५, रा. विसापूर) आणि रोहन राजू सिडाम (१९, रा. विसापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
यातील रुषेश उर्फ कोब्रा आत्राम याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ८५७/२०२६ मधील घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चौकशीत वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांतही चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पुढे आली आहे.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीतून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार विकास जुमनाके, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पुरुषोत्तम चिकाटे, पंकज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, शरदचंद्र कारुस, महेश कुकुडकर, शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी आणि संदीप थेरे यांनी सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.







