विजय हागे : द रिपब्लिक न्युज नेटवर्क
टुनकी ः पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. या महिन्याचे आणखीनही एक वैशिष्ट आहे. या काळात संपुर्ण निसर्ग हा हिरवळीने नटलेला असतो. अशातच अनेकांना वेध लागतात ते भटकंतीचे मागील एक दाेन वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्यात असलेले असेच एक ठिकाण आहे कि त्याला गत काही वर्षात खुप महत्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणाचे नाव आहे जटाशंकर. मागील काळात या ठिकाणाला खुप प्रसिध्दी मिळाली.परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असून जिल्ह्यात रुग्णसंख्या हि झपाट्याने वाढत आहे. अशातच श्रावण महिना दहा दिवसावर येवून ठेपला असून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने यावेळी वनविभागाने येथे जाण्यास बंदी घातल्यास पर्यटकांचा हिरमोड होऊ शकतो.
बुलडाना जिल्हातील संग्रामपुर तालुक्याला सातपुड्याच्या पर्वतरांगा लागुण असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नैसर्गीक साधनसंपत्ती लाभली आहे.शिवाय अकोला ,अमरावती आणि मध्य प्रदेश यांच्या सिमेला लागुण असल्याने तालुक्याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य पर्यटनस्थळे विशेष आकर्षण केद्र बनत चालली आहेत. पावसाळ्याच्या दिवसामधे नदी , नाले, धबधबे मोठया प्रमाणात वाहत असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात निसर्गाचा आनंद लुटण्याकरिता गर्दी करतात . पुरातन काळातील किल्ले ,तलाव ,गुहा, मंदीर, आणि वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वन्यप्रेमीचे विशेष आकर्षण केंद्र बनत आहेत. जुन महिण्यात पावसाचे आगमण झाल्याने सातपुड्याच्या पर्वतरांगा मधे नवीन पालवी फुटून हिरवड झालेली आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगात यंदा भरपूर प्रमाणात मान्सुनच्या सरी कोसळल्याने नदी ,नाले , धबधबे वाहु लागलेले आहेत त्यामुळे श्रावण लागताच सातपुड्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांना नक्कीच खुणावताना दिसतात.
येथील जठा शंकर धबधबा हा पहाडाच्या मध्यभागी कोरीव काम करून महादेवाची मुर्ती आहे. त्यावरून धबधबा वाहत असल्यामुळे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भावीकाची गर्दी असते. महादेवाचे दर्शन करण्याकरीता धबधब्याखालुन प्रवेश करावा लागत असल्यामुळे भावीकांना दर्शनाचा वेगळाच आनंद मिळतो. परंतु पर्यटनाचा आनंद यावेळी लुटता येईल कि नाही याबाबत अद्याप सांगत येणार नाही.