Home राजकारण राजकारणातील ‘हनी ट्रॅप’ !

राजकारणातील ‘हनी ट्रॅप’ !

212

स्टोरी – अभय देशपांडे

बलात्काराचे आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वत:च कबुली दिल्यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. परंतु आरोप करणा-या महिलेने आम्हालाही जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करणारे आणखी तीन लोक पुढे आल्याने ते दोषी आहेत की पीडित असा प्रश्न उभा राहिला व पदावरील गंडांतर टळले. राजकारणात या टप्प्यावर पोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, खडतर परिश्रम घ्यावे लागतात. पण पूर्वी कधीतरी घडलेली एखादी चूक संपूर्ण राजकारण धोक्यात आणू शकते हे या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आले. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उगाच आकांडतांडव न करता संतुलित भूमिका घेतली. त्याबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात असले तरी ही भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे.
सामाजिक न्यायमंत्री, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे मागच्या आठवड्यात राजकारण तापले होते. बलात्काराचे आरोप व एका महिलेबरोबरील संबंधांची स्वत:च दिलेली कबुली यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार अशी चिन्हं होती. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तसे संकेत दिले होते. परंतु बलात्काराचे आरोप करणारी महिला ‘ब्लॅकमेलर’ असून आपल्यालाही ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता असे सांगणारे तीन तक्रारदार पुढे आल्याने मुंडे यांच्या मंत्रिपदावरील गंडांतर टळले. भाजपच्या काही नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी भूमिका घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आल्यानंतर पुढील मागणी करू अशी संयत भूमिका घेतली.

त्यांची ही भूमिका, राष्ट्रवादीतील मतभेद व प्रकरणाला मिळालेले वेगळे वळण या सर्वच बाबींना वेगवेगळे कंगोरे आहेत. पण या निमित्ताने राजकारणातील किंवा सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीला गतकाळातील काही चुका सापशिडीतील सापाप्रमाने पुन्हा शून्यावर नेऊन ठेवू शकतात ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना किती काळजी घ्यावी लागते याची जाणीवही सर्वांना यामुळे झाली असेल. अधिकारपदामुळे अनेक बाबी सहज प्राप्त होत असल्या तरी भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात तसेच वलयांकित व्यक्तींना सापळ्यात अडकवण्यासाठी जागोजागी कसे सापळे लागलेले असतात व त्यातून सावधपणे मार्ग काढता आला नाही तर आपल्या वाटचालीला कसा ब्रेक लागू शकतो याची जाणीवही या प्रकरणाने दिली आहे.

रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करताना या तक्रारीची प्रत व काही फोटो समाजमाध्यमातून प्रसिद्ध केले होते. त्यावर उलटसुलट चर्चा सुरू असताना स्वत: धनंजय मुंडे यांनी स्वत:च पुढे येऊन या प्रकरणाची सगळीच माहिती लोकांसमोर ठेवली. समाज माध्यमांमधून आपल्यावर सुरू असलेले बलात्काराचे आरोप फेटाळून लावताना बलात्काराचा आरोप करणा-या महिलेच्या बहिणीसोबत आपले २००३ पासून संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. परस्पर सहमतीने हे संबंध होते व ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार सर्वांना माहीत आहे. परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे मी त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना मुंबईत सदनिका घेण्यासही मदत केली आहे. परंतु २०१९ पासून सदर महिला व तिच्या बहिणीने मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी करून धमक्या दिल्या जात आहेत. समाज माध्यमावर माझी बदनामी सुरू असल्याने आपण न्यायालयात जाऊन मनाई हुकूम घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या खुलाशामुळे समाजमाध्यमातून होणा-या आरोपांना एकप्रकारे दुजोराच मिळाला व मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी जोरदार फिल्ंिडग लावली. १५ वर्षांनंतर एखादी महिला असे आरोप करते तेव्हा स्वाभाविकच हे प्रकरण सरळ सोपे नाही हे लक्षात येत होते. परंतु या प्रकरणात ती महिला नव्हे तर आपणच पीडित आहोत हे धनंजय मुंडे यांचे म्हणणे कोणी स्वीकारायला तयार नव्हते. केवळ आरोप झाले म्हणून कोणतीही शहानिशा न करता कारवाई करणे अयोग्य असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतली.

परंतु आरोपांचे स्वरूप वेगळे असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी न्यायालयाचा निर्णय येईल तेव्हा येईल, पण पक्ष म्हणून आम्हाला भूमिका घ्यावी लागेल असे उघडपणे सांगून कारवाईचे संकेत दिले होते. मात्र नंतर भाजपचे नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे विभागप्रमुख मनीष धुरी व जेट एअरवेजचे पायलट असे तीन लोक पुढे आले व त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणा-या महिलेने आपल्यालाही असेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असा जाहीर गौप्यस्फोट केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. भाजपच्याच एका नेत्याने तक्रारकर्त्याच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने स्वाभाविकच भाजपच्या काही नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेतील हवा निघून गेली. कायद्यात ‘क्लीन हँड डॉक्टरिन’ नावाचे एक तत्त्व आहे. तुम्ही न्यायाची अपेक्षा करता तेव्हा तुमचे हात स्वच्छ असावे लागतात. या प्रकरणात तोच प्रश्न उभा राहिला असून तक्रारकर्त्या महिलेच्या हेतूबद्दल संशय निर्माण झाला आहे.

फडणवीसांनी भूमिकेचे स्वागतच हवे !
बलात्काराच्या आरोपामुळे स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कठोर भूमिका घेतलेली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी स्वत: महिलेबरोबरील संबंधांची कबुली दिली आहे. आपण कोर्टात गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नैतिकता महत्त्वाची आहे. चौकशी करून काय बाहेर येतं ते बघावं, त्यानंतर आम्ही पुढची मागणी करू अशी संयमित भूमिका फडणवीस यांनी घेतली. कृष्णा हेगडे हे ही पुढे आले. यामुळे फडणवीसांनी मुंडेंना मदत केली अशीही चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस व अजित पवार यांचे जे ७२ तासांचे सरकार स्थापन झाले होते त्यात मुंडेंची भूमिका महत्त्वाची होती व त्यामुळेही मदत केली असावी अशीही कुजबुज रंगली होती. कारण काहीही असले तरी फडणवीस यांनी घेतलेल्या संयत भूमिकेची प्रशंसाच करावी लागेल.

राजकारणात उभे राहण्यासाठी, या टप्प्यावर पोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लावतो. प्रचंड परिश्रम त्यामागे असतात. एखाद्याच्या आरोपामुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आरोपांची संपूर्ण शहानिशा व्हावी ही फडणवीस यांची भूमिका कौतुकास्पद आहे. राजकीय साठमारीत याचे अनेकांना भान राहत नाही. ऊठसूठ कोणाच्या ना कोणाच्या राजीनाम्याची मागणी करणा-या भाजपमधील नेत्यांनीच नव्हे सर्वांनीच यातून बोध घ्यायला हवा.

पुढच्यास ठेच……!
या प्रकरणानंतर राजकारणातील ‘हनी ट्रॅप’, ‘विषकन्या’ याची अनेकांना आठवण झाली. खरंतर यांचं अस्तित्व अगदी पुराणकाळापासून आहे. तरीही त्यात अडकणा-यांची संख्या कमी होत नाही. किंबहुना त्यात अडकण्यासाठी सापळे शोधणारे व आपल्याकडे असलेल्या सत्ताशक्तीद्वारे वशीकरण करणा-यांचीही संख्या कमी नाही. त्यातच त्यांना पुरुषार्थ वाटतो. मध्यंतरी मध्य प्रदेशात तर दोन डझनपेक्षा जास्त नेते व वरिष्ठ अधिकारी याच वृत्तीमुळे ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकल्याची चर्चा होती. राजकारणात भ्रष्टाचाराचे आरोप नवे राहिलेले नाहीत. पण चारित्र्याबाबत होणारे आरोप आजही खूप गांभीर्याने घेतले जातात. प्रत्येक क्षेत्रात समाजात असलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रतिबिंब दिसत असले तरी आपले नेतृत्व करणा-याचे व्यक्तिमत्त्व आदर्श, स्वच्छ असावे अशी समाजाची अपेक्षा असते. अमेरिकेसारख्या खुल्या संबंधांना मान्यता देणा-या समाजाला माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्ंिलटन व मोनिका लेवेन्स्की यांचे विवाहबा संबंध सहज स्वीकारता आले नाहीत. देशाच्या राजकारणात ज्या ज्या नेत्यांवर अशा स्वरूपाचे आरोप झाले ते त्यांना शेवटपर्यंत चिकटले. त्या प्रतिमेतून त्यांना बाहेर पडता आले नाही. राजकरणात सर्वोच्च पदं भूषवण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्यांनी याची जाणीव ठेवणे केव्हाही चांगले. यालाच पुढच्यास ठेच, मागचा शहाणा म्हणतात.