Home राज्य शेतकरी उद्योजकाकडून चक्क हेलिकॉप्टर खरेदी

शेतकरी उद्योजकाकडून चक्क हेलिकॉप्टर खरेदी

89

ठाणे: भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे .जो संपूर्ण तालुक्यासह राज्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आल्याने ग्रामीण भागात मर्सिडीझ ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु,रेंजरोव्हर ,एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात .एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडिल्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण आर. पाटील या आगरी समाजातील उद्योजकांकडे आहे. आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वाना अचंबित केले आहे .
घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली . यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसाया निमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले असून, स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान या भागात नेहमी जावे लागते तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सर्व सुबत्ता असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांचे नऊ आसनी नवे कोरे हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी मिळणार असल्याने आज त्यांच्या जागेवर नक्की काय व्यवस्था आहे याची चाचपणी करण्यासाठी रविवारी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते. त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर,सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टर मध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता नुकताच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींसह गावातील आपल्या जवळच्या मित्र मंडळींना फेरफटका मारून आणला, व सर्वांनी या हेलिकॉप्टरचे जंगी स्वागत केले .