Home Breaking News कोरोना अलर्ट: बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

कोरोना अलर्ट: बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

72

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग’ वाढवावे: जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

विनामास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करा
होम आयसोलेशनची सुविधा बंद करावी
बुलडाणा,दि. 16 : कोरोना संसर्गाचे प्रमाण गत तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढले आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी पॉझीटीव्ह रूग्णाच्या हाय व लो रिस्क संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी. त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिल्या.

कोरोना संसर्ग नियंत्रण कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांवर भर देण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, पॉझीटीव्ह रूग्ण असलेल्या गावांमध्ये मोबाईल टेस्टींग युनीट सुरू करावे. यासोबतच प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क वापरणे, हात सॅनीटाईज करणे किंवा स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या बाबींचा अवलंब करावा. जे कुणी बाहेर पडल्यानंतर मास्क लावणार नाही, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन करणार नाही, त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करेल. तसेच शहरांमध्ये ज्या दुकानांसमोर सोशल डिस्टसिंग पाळले जाणार नाहीत किंवा तिथे विना मास्क ग्राहक दिसतील, अशा दुकानदारांवरसुद्धा करवाई करावी.

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाले, एका पॉझीटीव्ह रूग्णामागे 15 हाय रिस्कमधील व 20 लो रिस्कमधील अशाप्रकारे 35 नागरिकांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग थांबविणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सुपर स्प्रेडर असलेले दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच ज्यांना लोक जास्त भेटतात त्यांच्या 100 टक्के तपासण्या बंधनकारकरित्या कराव्यात. अशा सुपर स्प्रेडरची महिन्यातून दोनवेळा तपासणी करावी. सध्या पॉझीटीव्ह रूग्णांना होम आयसोलेशन दिल्या जाते. ही सुविधा बंद करण्यात यावी. कारण असे रूग्ण बाहेर फिरतांना आढळतात. त्यांच्यामुळेही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आयसोलेशनची पुर्ण व्यवस्था आहे, त्यांनाच होम आयसोलेशन द्यावे. अन्यथा ही सुविधा देवू नये. तालुका स्तरावरील यंत्रणांनी समन्वय ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तरी पॉझीटीव्ह रूग्णांना आधी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे. कोविड केअर सेंटरमधील मनुष्यबळाला कन्ट्युनेशन द्यावे. दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी.

ते पुढे म्हणाले, मलकापूर तालुक्यात पॉझीटीव्ह व मृत्यू दर जास्त आहे. तेथील यंत्रणांनी गांभीर्याने घेत कोरोना संसर्ग रोखावा. शहरात कुठेही हॉटस्पॉट होवू देवू नये. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांची यादी तयार ठेवून त्यांच्या कुटूंबीय, कॉन्टॅक्टमधील नागरिकांची कोरोना चाचणी करावी. अशाचप्रकारे चिखली, खामगांव आदी ठिकाणीसुद्धा कारवाई करावी. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही आवश्यक त्या सुचना दिल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे सादरीकरण अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी, तर आभार माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे यांनी मानले.