Home Breaking News मशागतीचा खर्च ही निघाला नाही : अद्रक कवडीमोल भावात

मशागतीचा खर्च ही निघाला नाही : अद्रक कवडीमोल भावात

71

अनंतसिंह बोराडे

खामगाव – खामगाव तालुक्यात पोरज, निमकवळा, काळेगाव, वर्णा, रोहणा, भालेगाव बाजार, ढोरपगाव, तांदुळवाडी, पिंपळगाव राजा, परिसरात  मोठ्या प्रमाणात अद्रक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी २०२० मध्ये जून, जुलै, महिन्यात अद्रक चे भाव ६ ते ७ हजार रुपये क्विंटल झाले होते. यावर्षी भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अद्रक लागवडी कडे कल वाढला होता. शेतकऱ्यांनी चांगल्या भावाचे स्वप्न पाहिले होते. अनेक शेतकरी  अद्रक उत्पादन घेतात. काही वर्षात पाऊस अत्यल्प पडल्याने उत्पादनात घट होत होती. यावर्षी मात्र दमदार पावसामुळे अद्रकीचे पिक बहरले असताना. उत्पादनातही वाढ झाली होती. मार्च ते एप्रिल महिन्यात  काढणीच्या हंगामात अद्रक ला १५०० ते १७०० प्रति क्विंटल  रुपये कवडीमोल भाव मिळत असल्याने अद्रक उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अद्रक ला लागवडीसाठी बेणे, लागवड खर्च, रसायनिक खते, औषधे कीटकनाशके, फवारणी, डवरणी, निंदन, तसेच अद्रक काढणी साधारणता एक ते दीड लाख   रुपये एकरी खर्च येतो. प्रती एकर ४० ते ५० हजाराचे उत्पन्न निघत असल्याने जेवढा खर्च तेवढे उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे अद्रक उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली  असून एवढ्या मोठ्या प्रमाणात जास्त खर्च होऊनही  वेळेवर अद्रक ला भाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण क्षेत्र वाढीव दरात घेऊन यांना पुढे विपुलन करण्यासाठी जोडून देण्याची निवेदन केले असले, तरी अद्यापही शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसून ,संबंधित प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शनाची मागणी शेतकरी करीत आहेत.

अद्रक पिकाला अनुदान देणे गरजेचे
अद्रक या पिकांना उत्पादन खर्च मोठा येतो साधारणपणे एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पादन होते. नाहीतर ओला, किंवा कोरडा दुष्काळ, असला किंवा योग्य बाजार भाव मिळाला नाही. तर शेतकरी अडचणीत सुद्धा येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकावर ती शासनाने नुकसान भरपाईचे अनुदान देणे गरजेचे आहे.

“‘अद्रक हे अनिश्चित स्वरूपाचे पीक आहे. चांगले पीक झाल्यास ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न होते. अन्यथा उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे शासनाने या अद्रक पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान तसेच बाजारपेठेत माल  पोहोचविण्यात बाबत नियोजन करण्याची गरज आहे.
– वसंतसिंह बोराडे, अद्रक उत्पादक शेतकरी पोरज”