Home मुंबई सामान्य कार्यकर्ता, तीन टर्म मंत्री अशी अनिल देशमुख यांची कारकीर्द तीन दिवसांत...

सामान्य कार्यकर्ता, तीन टर्म मंत्री अशी अनिल देशमुख यांची कारकीर्द तीन दिवसांत धोक्यात!

108

 

नागपूर : महाविकास आघाडी सरकार मधील सध्या चर्चेत असलेले नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आजवरचा राजकीय प्रवास सामन्य कार्यकर्ता ते मंत्री असा राहिला आहे. पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यावर त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, तीन टर्म मंत्री पदे  त्यांनी भूषवली. राजकारण म्हटलं की राजाचा रंक कधी होईल हे सांगता येत नाही. अनिल देशमुख यांच्या बाबत तेच घडले आणि त्यांना गृहमंत्री पद सोडावं लागलं..तीन चार दिवसांत राज्यात नाट्यमय घडामोडी होवून अनिल देशमुख यांच्या 30  ते 35 वर्षे गाजलेल्या कारकिर्दीची आता खरी कसोटी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासपात्र म्हणून विदर्भातील एक महत्त्वाचे नेते अनिल देशमुख ओळखले जातात, त्यामुळेच आघाडीचे सरकार आल्यावर त्यांना महत्त्वाचे गृहमंत्री पद मिळाले. सरकार एक वर्ष पूर्ण करत नाही तोच देशमुख यांच्यावर त्यांच्याच खात्यातील अधिकारी परमवीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा कथित आरोप केला आहे, आधी सचीन वाझे या पोलीस अधिकाऱ्याची अटक व नंतर अनेक घडामोडी होत हे प्रकरण खूपच तापत आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला तरी अजून रोज नवीन काही तरी आरोप प्रत्यारोपण यात सुरू असतात.

अनिल देशमुख यांची कारकीर्द
नागपूरच्या नरखेड तालुक्यातील वडविहिरा हे अनिल देशमुख यांचे मूळ गाव आहे. त्यानी प्राथमिक शिक्षण काटोलमध्ये तर नागपुरातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. १९७० साली अनिल देशमुख हे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात सक्रिय झाले. पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि निवडणूनही आले. त्यांनी आपल्या संबंधाच्या बळावर नरखेड पंचायत समितीचे सभापतिपद मिळवलं. पुढे १९९२ साली ते नागपूर जिल्हा परिषदेत जलालखेडा गटातून सदस्य म्हणून निवडून आले जिल्हा परिषदेत पण अनिल देशमुखांचे भाग्य उजळलं आणि ते जुलै १९९२ मध्ये नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष बनले. तेव्हा राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता.

काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. काँग्रेसचे आमदार सुनील शिंदे, शेकापचे वीरेंद्र देशमुख आणि भाजपच्या प्रेरणा बारोकर या मैदानात होत्या. अनिल देशमुख प्रचंड मतांनी अपक्ष निवडून आले.

युतीच्या सरकारमध्ये मंत्री

पहिल्याच टर्ममध्ये त्यांना युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. देशमुखांकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली. युती सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनीच ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार सुरू केला होता. अपक्ष असलेले अनिल देशमुख १९९९ साली पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द चांगली राहिली.

१९९९ आणि २००४ मध्ये आमदार बनत त्यांनी काटोलमधून हॅट्ट्रिक केली. १९९९ च्या आघाडी सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्रिपद होतं. पुढे २००१ ला कॅबिनेट आणि २००४ ला सार्वजनिक बांधकामच कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालं. २००९ च्या आघाडी सरकारमध्ये ते नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण चे कॅबिनेट मंत्री होते.

शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री असताना सिनेमागृहात राष्ट्रगीताची सक्तीचा निर्णय व सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात मुंबईतील सात किलोमीटरचा वांद्रे-वरळी सी लिंक पूर्ण झाला. दीर्घकाळ आपली राजकीय कारकीर्द गाजवरणारे अनिल देशमुख आता मात्र अडचणीमध्ये सापडले आहेत. त्याचे मंत्रीपद तर गेलेच पण त्यांच्या राजकिय कारकिर्दीची कसोटी लागली आहे.