Home Breaking News प्राध्यापिकेचा वाढदिवशीच कोरोनाने मृत्यू

प्राध्यापिकेचा वाढदिवशीच कोरोनाने मृत्यू

73

मोबाईलवर ऑक्सिजन लेव्हल खालावल्याची दिली होती माहिती

खामगाव – माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व माझी ऑक्सिजन लेव्हल कमी अाहे. अशी माहिती देणाऱ्या शहरातील गो.से. महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या निधनाची दुसऱ्याच दिवशी निधनाची बातमी आल्याने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढदिवसाच्या दिवशीच श्वास गुदमरल्याने सदर प्राध्यापिकेने अखेरचा श्वास घेतला.
कोरोना संसर्गाने विदारक स्वरूप धारण केले असून कोरोना संसर्गीत रूग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. येथील गो.से. महाविद्यालयात कॉम्प्युटर विभागातील प्राध्यापिका ईशिता उमेश वानखडे वय २९ रा. खामगाव यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास सुरू होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली. दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची १४ एप्रील रोजी त्यांच्या वाढदिवशी ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. याबाबत त्यांनी व्हॉट्सॲपवर माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे व माझी ऑक्सिजन लेव्हलही फार कमी झाल्याचे भावनीक मॅसेज स्टेटसवर ठेवले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी १५ एप्रीलला त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रा. ईशिता वानखडे यांचे वय फक्त २९ वर्ष इतकेच होते. इतक्या कमी वयात त्यांचा कोरोनाने बळी गेल्याने शिक्षक व प्राध्यापक वर्गात खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या दुर्देवी निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. शहरात ऑक्सिजन बेडची कमतरता निर्माण झाली आहे. त्याचाच हा उदाहरण आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता भासत आहे. मात्र वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचारासाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेमडिसवीर इंजेक्शनचाही तुटवडा असल्याने अनेक रूग्णांना योग्य तो उपचार मिळत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रेमडिसवीर इेजेक्शनचाही पुरवठा करावा अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

माता-पित्याची सेवा करतांना ईशिता पॉझिटिव्ह
आई-वडीलांची प्रकृती काही दिवसांपासून अत्यवस्थ झाल्याने प्रा. ईशिता वानखडे ह्या त्यांच्या आई-वडीलाचं सेवा करत त्यांना वैद्यकिय उपचारासाठी लक्ष देत होत्या. दरम्यान त्यांना कधी कोरोना संसर्गाने हेरले हे त्यांना कळलेच नाही. ५ ते ६ दिवस कोरोना आजाराशी झुंज देत त्यांनी १५ एप्रीलच्या रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या दुर्देवी निधनाने त्यांच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे.