Home Breaking News शेतकऱ्यांचे कैवारी: स्व.भाऊसाहेब फुंडकर

शेतकऱ्यांचे कैवारी: स्व.भाऊसाहेब फुंडकर

82

 

नेता असावा ऐसा समाजाला उपयोगी पडे
हटवी सामान्य जीवनांतील समस्यांचे खडे
विचार डोक्यात सदैव कल्याण सामान्यांचे
मिळती सेवाभाव,परोपकार,आदर्शाचे धडे

सुखात इतरांच्या हासे दुःखात त्यांच्या रडे
इतरांच्या सुखासाठी भोवती उभारी कडे
त्याग, बलिदान,राष्ट्रभक्ती पुरेपूर भिनलेली
विश्वासाला जपणारा जो त्यांच्यासाठी लढे

वरील ओळींत आदर्श नेता कसा असावा हे सांगितलेले आहे. या सर्व कसोट्यांवर खरे उतरणारे नेते खरोखर देशाचा एक ठेवा असतात. त्या यादीमध्ये एक नाव कायम आदराने समाविष्ट केले जाते. ते नाव म्हणजे विदर्भाचे थोर सुपुत्र स्व.भाऊसाहेब उर्फ पांडुरंग पुंडलिक फुंडकर.
भाऊसाहेबांचा जन्म २१ ऑगस्ट १९५० ला नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे शेतकरी, त्याची शेती, त्यांतील समस्यांची जाणीव भाऊसाहेबांना लहाणपणापासूनच होती. तसेच त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण ठासून भरलेला होता. युवा दशेपासूनच ते समाजसेवेत अग्रेसर होते. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचे नेतृत्व पुढे आले व सर्वमान्य झाले. त्यांना समाजसेवेची सुरुवातीपासूनच आवड. त्यामुळेच सर्वसामान्यांसारखे जीवन न निवडता त्यांनी सामान्यांच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण करायचे ठरवले व समाजकार्यात उडी घेतली. समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य केले व त्यांच्या जीवनात समॄदधीचा प्रकाश पसरवला. हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवल्यामुळे त्यांच्याकडे तेव्हापासूनच जनसंघ, भारतीय जनता पक्षातील विविध महत्त्वाची पदे मिळाली. १९७४ पासून तर ३१ मे २०१८ पर्यंत इतक्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी पक्षातील मोठमोठ्या पदांवर कार्य केले व आपला अमिट ठसा जनमानसांच्या ह्यदयांवर तसेच देशाच्या व राज्याच्या राजकारणावर उमटवला. विषयाचा गाढा अभ्यास, मंत्रमुग्ध व विचारप्रवण करणारी वक्तॄत्वशैली, समस्या मांडणीतील कळकळ यामुळे जेव्हा भाऊसाहेब बोलायला लागत तेव्हा त्या भाषणाचा खूप प्रभाव पडायचा व समस्या तात्काळ सोडवल्या जायची. त्यांना समाजाच्या समस्यांचा सखोल अभ्यास असायचा. त्यामुळे अमोघ अशा वक्तॄत्व शैलीमुळे व आक्रमकपणे तसेच आंतरिक कळकळीमुळे ते विधान भवनाच्या आत व बाहेर समस्या मांडायचे व त्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे लोकांनी त्यांना १९७८ व १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार केले. १९८९, १९९१ व १९९६ अशा सतत तीन वेळा खूप मोठ्या मताधिक्याने अकोला लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब निवडून आले. २००२,२००८ व २०१४ मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून आले. १९९२ ते १९९९ व २००० ते २००३ या कालावधीत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, १९९६ मध्ये महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रमुख प्रशासक तसेच ११ एप्रिल २००५ ते डिसेंबर २०१२ पर्यंत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते इत्यादी मोठ्या पदांना त्यांनी यशस्वी न्याय दिला. त्यामुळे त्यांना २००७ मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते “उत्कृष्ट संसदपटू” म्हणून सन्मानित करण्यात आले. कोणत्याही विषयाचा विशेषतः शेतीक्षेत्राचा त्यांचा सखोल व गाढा अभ्यास होता. त्यामुळे संसदेच्या अंदाज समिती, कॄषी समिती, परराष्ट्र व्यवहार समिती, वन संरक्षण समिती, पर्यावरण संरक्षण समिती इत्यादी विविध समित्यांचे ते सदस्य होते व अनेक परदेशी अभ्यासदौऱ्यांत त्यांचा समावेश केला जायचा. १९९८ मध्ये भाऊसाहेब फार थोड्या मतांनी पराभूत झाले. नाहीतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते निश्चितच केंद्रीय कृषिमंत्री राहिले असते. ती उणीव भरून निघाली ८ जुलै २०१६ ला जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा. कृषी खाते म्हणजे सर्वांत महत्त्वाचे तेवढेच जिकीरीचे खाते. बाराही महिने अतिवृष्टी, दुष्काळ, कर्ज, आत्महत्या, नैसर्गिक संकटे इत्यादी समस्या उभ्या ठाकतात. कृषी मंत्री हे खूप महत्त्वाचे पद. तितकेच आव्हानपूर्ण. कारण महाराष्ट्रातील शेतकरी बाराही महिने अतिवृष्टी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटे तसेच बी बियाणे यांच्या भाववाढी, त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळणे इत्यादी असंख्य संकटांचा सामना करीत असतो. तरीही नेटाने शेती करीत असतो. शेतकरी म्हणजे भाऊसाहेबांचा जीव की प्राण असल्यामुळे कोणतेही खाते मिळत असताना त्यांनी स्वत:हून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषी खाते स्वत:हून मागून घेतले. दुर्दैवाने ३१ मे २०१८ ला त्यांचे अकाली निधन झाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यांना उण्यापुऱ्या दोन वर्षांचा कालावधी मिळाला. पूर्ण कार्यकाळ ते पदावर राहिले असते तर त्यांनी नक्कीच महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचा चेहरामोहरा बदलला असता. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्यांनी असंख्य गावे जलयुक्त केली आहेत व तेथील लोकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला आहे. शेतीच्या प्रश्नांवर ते विशेष आक्रमक व्हायचे. “शेतकरी सुखी तर समाज सुखी” असे त्यांचे म्हणणे असायचे. शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात, चिखलात जाऊन त्यांच्या समस्या सोडवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी लोकांवर सदैव माया केली व प्रत्येकाशी अखंडपणे संपर्क ठेवला. प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झाले. त्यांनी कधीच आपल्या पदाचा, सत्तेचा मोठेपणा दाखवला नाही. ते खूप नम्र होते. त्यामुळे प्रत्येकाला ते आपलेसे वाटत. म्हणूनच त्यांना जनसामान्यांचे नेते म्हणूनही ओळखले जाते.
जनसामान्यांसाठी संघर्ष हा त्यांच्या नेतृत्वाचा स्थायीभाव होता. त्यामुळे जिथे जिथे अन्याय, अत्याचार, दुःख, शोषण दिसेल तिथे त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी ते नेहमी तयार असायचे. आणीबाणी काळात सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना अकोला कारागृहात तीन महिने व मिसा कायद्यांतर्गत नऊ महिने ठाणे कारागृहात तसेच एकूण अठरा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक सत्याग्रह केले.रास्ता रोको केले.मोर्चे काढले. पदयात्रा काढल्या.निदर्शने केली. लढे उभारले. त्यांपैकी सर्वांत गाजलेली पदयात्रा म्हणजे कापसाला हमीभाव मिळावा यासाठी खामगाव ते नागपूर विधान भवन ही पायी काढलेली ३५० किलोमीटरची पदयात्रा. या पदयात्रेत हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विधान परिषदेत संसदीय साधने वापरून शेतकऱ्यांचे प्रश्न व मुद्दे मांडून त्यांचा आवाज बुलंद केला. अमरावती विद्यापीठाच्या नामांतरामध्ये सिंहाचा वाटा. भाऊसाहेबांना शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीक्षेत्रातील वारकरी असे संबोधले जाते ते उगीच नाही.
स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. भाऊसाहेब फुंडकर, एकनाथराव खडसे यांनी महाराष्ट्रात , खेड्यापाड्यांत भाजपा पोहचवली. भाजपाचे भविष्य रेखाटले. भाजपाला व्यापक जनाधार मिळवून दिला. स्व. मुंडे साहेब व स्व. भाऊसाहेब फुंडकरांना ओबीसी समाजाच्या समस्यांची विशेष जाण होती. विदर्भ व मराठवाड्यातील या नेत्यांनी ओबीसींना भाजपाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले. ओबीसींना त्यांनी जवळ केले. ओबीसी साठी लढणारे ते नेते होते. आज ओबीसींच्या व इतर आरक्षणाच्या प्रश्नावर जे राजकारण सुरू आहे अशा परिस्थितीत स्व. भाऊसाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भाऊसाहेबांच्या अकाली जाण्याने ओबीसींचे खूप नुकसान झाले आहे. आज शेतकरी व ओबीसी समाजाच्या समस्या निर्माण होताना त्यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र सागर फुंडकर व आमदार आकाश फुंडकर हे समर्थपणे चालवत आहेत.
त्यांच्या कार्याचा आवाका प्रचंड होता. महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह फेडरेशन मुंबई – गोवा चे संचालक, खामगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंक चे सतत २२ वर्षे संचालक, १९९० ते २००० महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर संचालक, खामगाव एज्युकेशन सोसायटीवर संचालक, वनवासी सेवा समिती जळगाव जामोद वर संचालक, श्री संत भोजने महाराज संस्थान अटाळी अध्यक्ष, दीनदयाल सेवा समिती, तानाजी व्यायाम व क्रीडा मंडळ खामगाव, संजय गांधी सहकारी सूतगिरणी जळगाव जामोद चे अध्यक्ष, पांडुरंग नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक इत्यादी विविध संस्थांवर विविध पदे भुषविली. ह्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळूनही ते सदैव हसतमुख व क्रीयाशील असायचे. ते ऊर्जेचे अखंड स्त्रोत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके संपन्न असूनही ते प्रत्येकाशी जवळच्या मित्रासारखे बोलायचे. लाखो माणसे त्यांनी जोडली. राजकारणात राहूनही सुसंस्कृत राहणे, सर्व पक्षात त्यांचे मित्र असणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या श्रीमंतीचे लक्षण होते.
जाता जाता त्यांनी बुलढाणा रोडवर निम्न ज्ञानगंगा प्रकल्प पूर्णत्वास नेला. यासारखे अनेक प्रकल्प शिर्ला, ढोरपगाव व बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन उंचावले.
सद्या कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद आहेत. भाऊसाहेब हे खरे वारकरी होते. सतत चार दशके त्यांनी पंढरपूरची अखंडपणे वारी केली. आषाढी एकादशीला गेल्यावर ते बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील वारकऱ्यांना स्वत: अनेक मठांत जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपूस करायचे. त्यामुळे प्रत्येक वारीला वारकऱ्यांना त्यांची आठवण आवर्जून येते.
“भाऊसाहेब, तुम्ही आम्हांला आणखी काही वर्षे हवे होते.” असेच शब्द सर्वांच्या मनात असतील यात काहीच शंका नाही.

-प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे
मोबाईल – ७०३८२७६५५८
________________________________