द रिपब्लिक अपडेट न्यूज नेटवर्क
खामगाव:- तालुक्यातील कोणत्याही गावात पाणीटंचाई भासणार नाही याची दक्षता घ्या व तातडीने उपाययोजना करा असे निर्देश आ . अँड. आकाशदादा फुंडकर यांनी प्रशासनाला दिले. स्वातंत्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पाणीटंचाई, जलजीवन व स्वच्छ भारत मिशन महा आवास अभियानग्रामीण घरकुल योजना आढावा सभा आज 9 एप्रिल रोजी महात्मा गांधी प्रशासकीय सभागृहात पार पडली, त्यावेळी अध्यक्षस्थानी म्हणून आ. अँड फुंडकर बोलत होते. यावेळी मंचावर आ अँड फुंडकर यांचेसह उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी चांदनसिह राजपूत, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपअभियंता विलास चव्हाण, महावितरण कार्यकारी अभियंता अजितकुमार दिनोटे, उपकार्यकरी अभियंता राहुल बाहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ अँड फुंडकर यांनी खामगाव तालुक्यातील सर्व गावांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी पुढे बोलताना आ अँड फुंडकर म्हणाले की यंदा गावात पाणीटंचाई असेल असं वाटत नव्हतं परंतु अनेक गावात पाणीटंचाई असल्याचं माहिती पडलं. बहुतांश गावात पाणीपुरवठा योजना आहेत. तरीही गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहेत. अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहेत ते उन्हाळ्यापूर्वी पूर्ण करा असे आदेश दिले. तसेच घरकुल चा लाभ गरिबांनाच मिळावा याची काळजी घ्यावी, गावातील लोकांना विश्वासात घेऊनच यादी बनवावी, सर्व योजना वर्षानुवर्षे टिकतील असे कामे करा , तुम्ही याकडे लक्ष दिलेत तर गावातील शेतकरी शेतमजूर लोकांच्या डोळ्यात पाणी येणार नाही असेही आ अँड फुंडकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या” हर घर को जल, हर घर को नल” हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक तलाठी , ग्रामसेवक यांनी दररोज गावात थांबावे, लोकांची कामे करावी , कामात हलगर्जी करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा दम ही आ अँड फुंडकर यांनी अधिकारी वर्गाला दिला. या आढावा सभेत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, जि प सदस्य, प स सदस्य, तलाठी, ग्रामसेवक , ग्रामीण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.