Home Breaking News सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आले पाहिजे तरच परीवर्तन शक्य:शुभम आमने यांचे परखड मत

सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आले पाहिजे तरच परीवर्तन शक्य:शुभम आमने यांचे परखड मत

337

सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आले पाहिजे तरच परीवर्तन शक्य:शुभम आमने यांचे परखड मत

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

वरोरा:मी गेल्या पाच ते सहा वर्षापासून सामाजिक-राजकीय क्षेत्रात आवड असल्यामुळे सक्रियपणे काम करत आहे. मी सामाजिक क्षेत्रापासून कामाची सुरुवात केली. सुरवातीला स्वतःच्या गावात विविध सामाजिक उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम,स्पर्धा राबवत होतो मात्र ग्रामपंचायतिची राजकीय सत्ता ज्यांच्या ताब्यात होती त्यांना सामाजिक व विकास कामात रस नसल्याने गावाच्या विकासाला गती मिळत नव्हती. त्याला गती मिळण्यासाठी म्हणून मी वयाच्या एकवीसाव्या वर्षी थेट राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात उतरलो.

त्यामुळे स्थानिक राजकारण लक्षात आले. विविध प्रश्न समजत गेले. त्याची व्याप्ती समजली त्यामुळे विधानसभा व लोकसभा या निवडणुका आणि त्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी महत्वाचे असलेले समजले. गावपातळीवरील राजकारण देखील हीच मंडळी चालवतात. या दोघांची सांगड झाली तर गरिबांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तश्याच्या तश्याच राहतात हे लक्षात आले.

गोर-गरीब, कष्टकरी,शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार या सर्वांचे या व्यवस्थेकडून शोषण होत आहे. ग्रामीण भागाचा सर्वच क्षेत्रात विकास थांबलेला आहे. या सर्व गोष्टीला गती देण्यासाठी युवकांनी सक्रियपणे राजकारणात पुढे आले पाहिजे असं मला वैयक्तिक अनुभवावरून वाटतं.
आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तरुणांनी सक्रिय राजकारण केल पाहिजे. आज राजकारणात तरुण दिसत नाहीत जे आहेत ते या नेत्यांची मुलेच आहेत.

वास्तविक पाहता या देशाचं रक्षण सीमेवर राहून तरुण करू शकतो तर मग हा देश तरुण का चालवू शकत नाही? युरोपात देखील हे दिसून येते. मात्र आपल्याकडे राजकारण करणारी मंडळी ही जास्तीत पन्नाशी ते साठी पूर्ण केलेली आहे आणि तरुण कुठे आहेत? हे आतातरी आपण लक्षात घेतले पाहिजे.

आपल्याकडे वरच्या स्तरावर राजकारण करण्यासाठी कोणत्याही मोठ्या शिक्षणाची किंवा पदवीची अट नाही. डॉक्टर किंवा तज्ञ् मंडळीच्या मते जास्त वय झाले असता मानवाची वैचारिक, शारीरिक क्षमता कमी कमी होत जाते. मग ही मंडळी लोकांच्या विकास कामांना कसं प्राधान्य देणार आहे.

आपल्याला आपल्या गावाचा, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर सर्वासामान्य तरुणांनी ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून ते खासदार मंत्री पर्यंतच्या राजकारणात गेलं पाहिजे. निवडणूकीमध्ये सहभागी झालं पाहिजे.

राजकारण आणि निवडणूक म्हणजे पैश्याचा अति खर्च अशी परिस्थिती आहे पण या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर राजकारण केलचं पाहिजे आणि खरं म्हणजे जनतेने देखील कमी खर्च करणाऱ्या, सुशिक्षित, कामं करणाऱ्या युवकांना, स्वीकारलं पाहिजे तेव्हा कुठे परिवर्तन होणार आहे.

जेव्हा तरुणांचा बुलंद आवाज राजकारणात चारही दिशेने घुमेल तेव्हा कुठे विकासाला गती मिळणार आहे.
शुभम आमने (सामाजिक कार्यकर्ता )परसोडा त. वरोरा जि. चंद्रपूर शिक्षण :- बी.ए. व एम.एस.डब्लू.मो.९७६३०९९५०६