Home Breaking News काळा मंगळवार! भीषण बस अपघातात ९ ठार; १२ प्रवासी गंभीर जखमी ...

काळा मंगळवार! भीषण बस अपघातात ९ ठार; १२ प्रवासी गंभीर जखमी सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्कानजीक भरधाव कंटेनर- एसटी बसची समोरासमोर धडक

246

काळा मंगळवार! भीषण बस अपघातात ९ ठार; १२ प्रवासी गंभीर जखमी

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्कानजीक भरधाव कंटेनर- एसटी बसची समोरासमोर धडक

बुलढाणा :- पुण्याहून मेहकरकडे येणार्‍या एसटी महामंडळाच्या बसला मेहकरवरून सिंदखेडराजाच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कंटेनरने समोरासमोर दिलेल्या जोरदार धडकेत बसमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर चार प्रवाशांनी उपचारादरम्यान दम तोडला. दोन्ही वाहने भरधाव वेगात एकमेकांना समोरून धडकल्याने हा भीषण अपघात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते मेहकर रोडवरील पळसखेड चक्का गावाजवळ घडला. या दुर्देवी अपघातात आतापर्यंत ९ जण ठार झाले असून, आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, १२ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे उपचार सुरू होते. काहींना तातडीने जालना व छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून, कंटेनरमध्ये फसलेल्या चालकाला कटरच्या सहाय्याने पत्रा कापून बाहेर काढावे लागले. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले आहेत.

मेहकर आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच ४०-५८०२) ही पुणेवरून छत्रपती संभाजीनगरमार्गे मेहकरकडे येत होती. त्याचवेळी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कंटेनर ट्रक (क्रमांक ओडी ११ एस १६५७) आणि या बसची भरधाव वेगात असतानाच समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर १२ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

एसटी बस ही वेगाने मेहकरच्या दिशेने जात होती, तर कंटेनर हा मेहकरवरून सिंदखेडराजाकडे भरधाव वेगात येत होता. यावेळी दोघांची काही समजण्याच्याआत समोरासमोर धडक झाली. या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, उर्वरित चार जण उपचारादरम्यान दगावले, आणखी तिघांची प्रकृती अतिचिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.