Home Breaking News Bhadravati city@ news • आपल्या मुलाला मायोपिया तर नाही ना? •...

Bhadravati city@ news • आपल्या मुलाला मायोपिया तर नाही ना? • १२ वर्षाखालील मुलांमध्ये वाढले मायोपियाचे प्रमाण • पालकांची जागरूकता, लवकर निदान व वेळीच उपचार करून लघुदृष्टीवर मात करता येऊ शकते – डॉ. गुंजन इंगळे-कांबळे

406

Bhadravati city@ news
• आपल्या मुलाला मायोपिया तर नाही ना?

• १२ वर्षाखालील मुलांमध्ये वाढले मायोपियाचे प्रमाण

• पालकांची जागरूकता, लवकर निदान व वेळीच उपचार करून लघुदृष्टीवर मात करता येऊ शकते – डॉ. गुंजन इंगळे-कांबळे

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती :लहान मुलांची लघुदृष्टी/ निकटदृष्टी
लहान मुलांमध्ये लघुदृष्टी किंवा निकटदृष्टी हा नेत्रदोष आढळून येतो. लघुदृष्टी किंवा निकटदृष्टी यालाच मायोपिया (Myopia) असे म्हणतात. यात मुलांना दूरच्या गोष्टी नीट व स्पष्ट दिसत नाहीत. बारा वर्षांखालील मुलांमध्ये जगभरात मायोपियाचे प्रमाण वाढलेले आहे. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मायोपियाचे लवकर निदान व वेळीच उपचार होणे आवश्यक ठरते.

लघुदृष्टीची कारणे:
अनुवांशिकता, मोबाईल किंवा टीव्ही जास्त वेळ बघणे, घराबाहेर कमी खेळणे

लघुदृष्टीची लक्षणे: मुलांमधील लघुदृष्टीची लक्षणे वयोगटानुसार ओळखता येतात.

तीन वर्षांखालील मुलांमध्ये दिसणारी लक्षणे :
चालताना धडपडणे, समोर दिलेल्या वस्तूकडे दुर्लक्ष करणे, कोणतीही वस्तू (खेळणे किंवा पुस्तक) बघण्यासाठी चेहऱ्याजवळ धरणे, तिरळेपणा, पापण्यांची जास्त उघडझाप करणे.

तीन वर्षांवरील मुलांमध्ये दिसणारी लक्षणे :
दूरच्या वस्तू पाहताना अंधुक व अस्पष्ट दिसणे, डोकेदुखी, तिरळेपणा, शाळेत जाणाऱ्या मुलांना फळ्यावरचे न दिसणे, जवळून मोबाईल किंवा टीव्ही बघणे. हे लघुदृष्टीची लक्षणे पालकांनी लवकर व अचूक ओळखणे आवश्यक आहे.

लघुदृष्टीची तपासणी व उपचार:
लघुदृष्टीची लक्षणे दिसल्यास नेत्रतज्ञाकडे दाखवणे आवश्यक आहे. नेत्रतज्ञाद्वारे पूर्ण तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावा.

प्रतिबंधात्मक उपाय :
लघुदृष्टी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.
मुलांना दिवसातून कमीत कमी एक तास बाहेर खेळू द्यावे, वाचन करताना, टीव्ही बघत असताना वीस मिनिटानंतर वीस सेकंदासाठी वीस फूट दूर असलेली वस्तू बघणे, हिरव्या पालेभाज्या व फळांचा आहारात समावेश करणे तसेच, लहान मुलांची वयाच्या ६ महिने, ३ वर्षे व ६ व्या वर्षी नेत्र तपासणी अवश्य करावी. पालकांची जागरूकता, लवकर निदान व वेळीच उपचार करून लघुदृष्टीवर मात करता येऊ शकते.