Bhadrawati taluka @news
• भद्रावती शहरात घाणीचे साम्राज्य शिवसेना ( ठाकरे ) पक्षाचा आरोप
• तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : शहरात स्वच्छतेच्या नावाखाली घाणीचे साम्राज्य फोफावत असल्याचा शिवसेना ( ठाकरे ) पक्षाचा आरोप असून या समस्येवर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी . ही प्रमुख मागणी असलेले निवेदन मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना शिवसेना ( ठाकरे ) पक्षाचे शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांच्या नेतृत्वात तसेच पक्षाचे वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे आणि तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नंदू पढाल यांच्या मार्गदर्शनात नुकतेच सादर करण्यात आले.
या प्रसंगी युवा सेना सरचिटणीस येशू आर्गी, शहर उपप्रमुख अरुण घुगुल, शहर संघटक साहेबराव घोरुडे आणि सुमठाणा उपशाखाप्रमुख रोशन मदनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, भद्रावती नगरपालिका ही चंद्रपूर जिल्ह्यातील स्वच्छ नगरपालिका म्हणून नावलौकिकास आलेली आहे. भद्रावती नगरपालिकेला स्वच्छतेचे मानांकन मिळून पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. परंतु सदर मिळालेले मानांकन हे कागदोपत्री पाहायला मिळत आहे. असाही आरोप निवेदनातुन केलेला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या पावसाळा सुरू झालेला असून पहिल्या पावसाळ्यातच घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. भद्रावती येथे जूने मच्छी मार्केट येथील सार्वजनिक शौचालय ही वस्तू झालेली आहे. सदर ठिकाणी कोणतीही मूलभूत व्यवस्था पाहायला मिळत नाही. संपूर्ण शौचालय फक्त बांधून ठेवण्यात आलेले असून येथे सोयी नसल्याकारणाने नागरिकांकडून त्याचा वापर होताना दिसून येत नाही. त्यामुळे यावर नगर परिषदेने खर्च केलेला निधी वाया जात आहे. तसेच गावातील इतरही ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालययाची परिस्थिती सारखीच आहे. त्यामुळे आपण फक्त कागदोपत्री काम करीत असल्याचे दिसून येते. असेही निवेदनात नमूद केलेले आहे.
तसेच भद्रावती नगर परिषदेने किल्लावार्ड येथे अंडरग्राउंड नाल्याचे बांधकाम केलेले आहे. परंतु त्यावर बसवलेले चेंबर फुटल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहून जात आहे. यामुळे ये – जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आपण सदर विषयी स्वतः पाहणी करून वरील समस्या तात्काळ सोडवाव्या. भद्रावती येथील जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने योग्य उपाय योजना करावी. असेही निवेदनात शेवटी नमुद केले
◆स्वच्छता निरीक्षकाला आदेश देण्यात आले : डॉ. विशाखा शेळकी◆
सदर निवेदनासंदर्भात स्थानिक नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्याशी भ्रमरध्वनी वरुन संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, निवेदन मिळताच स्वच्छता निरीक्षकाला यासंबंधीचे आदेश देण्यात आले. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयाची सफाई सुध्दा नियमित केल्या जात असल्याचे डॉ. शेळकी यावेळी म्हणाल्या.
◆शहरात मोकाट कुत्रे व जनावरांचा हैदोस◆
भद्रावती शहरात ऐन पाऊसाळ्याच्या दिवसातच सर्वत्र मोकाट कुत्रे व जनावरांचा हैदोस सुरू असल्याने जनतेला कमालीचा त्रास होत आहे. यामुळे शहरात अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोकाट कुत्रे आणि जनावरांचा सर्वत्र वावर सुरु असल्याने जेष्ठ नागरिक आणि लहान बालकांना धोका असल्याने स्थानिक नगरपालिका प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घ्यावी. अशी मागणी सुध्दा शिवसेना ( ठाकरे ) पक्षाने निवेदन देतांना केली आहे.