Chandrapur dist@ news
• मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांवर पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांवर कारवाई करा
• चंद्रपुरातील आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- मणिपूर राज्यात आदिवासी महिलांवर पाशवी बलात्कार करुन त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्या खाजगी अवयवाशी छेडछाड केली. ही घटना अत्यंत निंदनीय असून मानव जातीला कलंकित करणारी आहे. सदर घटना 4 मे 2023 रोजी घडलेली असून 20 जुलै 2023 ला एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झालेली आहे. शेकडो लोकांच्या जमावाने त्यामध्ये सहभागी झालेले असून पोलीस व प्रशासन उघड्या डोळ्यांनी सर्व बघत असून कोणतेही कारवाई केलेली नाही. गेल्या तीन महिन्यापासून या घटनेची कुठेही वाच्यता केलेली नाही. यावरून सरकार जाणून-बुजून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा वरील घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतरही देशातून या घटनेची तीव्र शब्दात निंदा केलेली आहे.
एवढेच नव्हे तर माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा या प्रकरणात शासनाने योग्य कारवाई करण्याच्या सूचना केली. या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात असंतोष असून गुन्हेगारांना शिक्षा द्यावी तसेच या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी समस्त गोंडीयन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
यामध्ये चंद्रपूरातील गोंडवाना गणतंत्र पार्टी, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन, गोंडीयन मातृशक्ती संघटना, ऑल इंडिया भूमक संघटना, गोंडवाना विद्यार्थी संघटना, हिराई जीवन विद्या प्रतिष्ठान, बेरोजगार युवक संघटना इत्यादी संघटनेने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आत्राम, माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गणपत नैताम, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी कन्नाके, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन जिल्हाध्यक्ष प्रा. शांतारामजी उईके, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे संचालक विजय तोडासे, ज्योतीराम गावडे, रमेश कुंभरे गोंडीयन मातृशक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष रजनी परचाके, लताताई शेडमाके यांच्यासह आदिवासी सामाजिक संघटना, मातृशक्ती संघटनेच्या पदाधिकारी तथा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.