Chandrapur dist@ news
• चंद्रपुरात ओबीसीने काढली सरकारची प्रेतयात्रा ; पोलिसांनी घेतले सहभागी झालेल्यांना ताब्यात!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांचे गेल्या १४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू आहे. दरम्यान टोंगे यांची प्रकृती खालावली असताना देखील शासनाने या सुरु असलेल्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. इतकेच नाही तर मंत्रीमंडळातील एकही मंत्री आंदोलन स्थळी आंदोलन सोडविण्यासाठी आले नाही. यामुळे राज्य सरकार हे ओबीसी विरोधी असल्याची टिका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.आज रविवार दि.२४ सप्टेंबरला सकाळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर प्रेत यात्रा निघाली असताना पोलिसांनी जिल्हा न्यायालयासमोर आंदोलक कर्त्यांना ताब्यात घेतले. व आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांना चंद्रपूर पोलिस मुख्यालयात आणून ठेवण्यात आले .
ओबीसींच्या विविध रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णालयात ही त्यांचे उपोषण सुरू आहे. त्यानंतर रविवारी आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात प्रेत यात्रा काढण्यात आली. उपोषण मंडपातून ही प्रेत यात्रा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घराकडे निघाली. ॲड. दत्ता हजारे , ॲड. पुरुषोत्तम सातपुते, नंदू नगरकर, राजू बनकर यांनी प्रेत यात्रेला खांदा दिला. तर सूर्यकांत खनके यांनी आकटे धरले. यावेळी खनके यांनी मुंडण ही केले होते .त्या वेळी जिल्हा न्यायालय समोर पोलिस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी प्रेत यात्रा घेऊन जाणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. व आंदोलकांना पोलिस मुख्यालय येथे आणून ठेवण्यात आले. काही वेळा नंतर त्या आंदोलक कर्त्यांना सोडुन देण्यात आले.