Home Breaking News प्रा . सुनंदा पाटील ” गझलसरस्वती ” सन्मानाने विभूषीत “आजच्या लहान संमेलनातूनच...

प्रा . सुनंदा पाटील ” गझलसरस्वती ” सन्मानाने विभूषीत “आजच्या लहान संमेलनातूनच उद्याचे प्रस्थापित घडतात ” -गझलनंदा ◼️छत्रपती संभाजीनगर◼️

222

प्रा . सुनंदा पाटील ” गझलसरस्वती ” सन्मानाने विभूषीत
“आजच्या लहान संमेलनातूनच उद्याचे प्रस्थापित घडतात ” -गझलनंदा
◼️छत्रपती संभाजीनगर◼️

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

प्रस्थापित नाही म्हणून मंचावर संधी नाही. आणि मंच मिळत नाही म्हणून प्रस्थापित गझलकार होऊ शकत नाही , ही परिस्थिती नवोदित गझलकारांची आहे. यातून उत्तम मार्ग काढायचा असेल तर विभाग , जिल्हा , तालुका किंवा गावपातळीवर गझलसंमेलने व्हायला हवीत . यातूनच जर लेखणी दमदार असेल तर ते गझलकार आपोआपच पुढे येतील . त्यातूनच पुढची प्रस्थापितांची पिढी घडणार आहे , असे मत जेष्ठ गझलकारा तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका प्रा. सुनंदा पाटील यांनी ” छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी पार पडलेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले . त्या पुढे म्हणाल्या की , श्लोक , ओवी , अभंग , आर्या वगैरे अनेक काव्यप्रकार तंत्राधिष्ठीत आहेत . या कोणत्याही प्रकारावर तंत्रशरणतेचा आरोप होत नाही . मग गझल तेवढी तंत्रशरण कशी ? उलट गझल ही वृत्तबद्ध विधा तुमच्या समोर काव्यात्म नजराणा ठेवते , म्हणूनच मराठी गझल लिहिताना कवीची कसोटी असते.
अध्यक्ष स्थानावरून प्रा. सुनंदा पाटील म्हणाल्या, गझल शिकता येत नसते तर गझलेचे तंत्र शिकता येते. गझल लेखनाकडे वळताना सर्वप्रथम गझलेचे शरीरशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर अस्सल कवी सुरेख गझल लिहू शकतो.

सातत्य , सराव, आणि संयम ही त्रिसूत्री प्रत्येक गझलकाराने लक्षात ठेवायलाच हवी. केवळ तंत्र आणि मंत्र या गझलेच्या नाण्याच्या दोन बाजू नसून त्याला तिसरीही बाजू असते ती म्हणजे नाण्याची कडा . ती असते , शुद्ध मराठी भाषा , व्याकरण आणि शुध्दलेखन ! मराठी भाषा गर्भश्रीमंत आहे. आपली आई आहे. इतर भाषांचा दुस्वास करू नयेच . त्यांना मावशी म्हणा हवं तर !पण मराठीला आईच राहू द्या तिचा अभिमान बाळगा !

रेणूका गझल मंच आयोजित राज्यस्तरीय प्रथम गझल संमेलनात जेष्ठ गझलकार आणि संमेलनाध्यक्ष प्रा. सुनंदा पाटील यांना , त्यांच्या मराठी गझलेतील प्रदीर्घ योगदानाबद्दल ” गझल सरस्वती ” हा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

प्रारंभी महात्मा गांधी आणि मराठी गझलेचे संस्थापक गझलसम्राट स्व . सुरेश भट यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटक जेष्ठ विचारवंत आणि गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी होते. मानवी जीवनातील भाव भावनां प्रमाणे समाज जीवनात निर्माण झालेल्या समकालीन प्रश्नांबाबत , व्यवस्थेबाबत , परखड आणि दिशादर्शक भाष्य करणे हे प्रत्येक गझलकाराचे कर्तव्य आहे .
संयोजक या नात्याने जेष्ठ गझलकार डॉ. इक्बाल मिन्ने यांनी आपाते मनोगत व्यक्त केले . संमेलनांचे आयोजक डॉ. रे . भ. भारस्वाडकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले ” सुरेश भट यांच्यानंतर गझल तंत्रावर ,एकमेव, हुकूमत असलेल्या फक्त सुनंदामाईच आहेत.
या संमेलनात डॉ.शेख इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुशायरा झाला. त्यामध्ये डॉ. र.भा.भारसवाडकर , बापू दासरी, डॉ. लक्ष्मण शिवनेरकर ,हर्षल आचरेकर,आत्माराम कदम ,रमेश डफळ,प्रा. डॉ. अविनाश कासंडे,आत्माराम जाधव ,गौतम सूर्यवंशी,डॉ. प्रशांत पाटोळे ,अरुण कटारे,सुवर्णा मुळजकर, ,प्रा. डॉ. अविनाश कासंडे,आत्माराम जाधव , अनिकेत सागर, क्रांती वेंदे, आत्तम गेंदे,दीपक हापत, शेखर गिरी,गिरीश जोशी, संजय पवार, अनुराधा वायकोस, यशवंत मस्के, वृषभ कुलकर्णी ,सोमनाथ सोनवणे, सुनिता कपाळे इत्यादी नामवंत गझलकारांनी आपल्या गझला सादर करून दाद मिळवली. छत्रपती संभाजी नगर येथील गांधी भवन संस्थेच्या सभागृहात हे संमेलन झाले. मराठवाड्यात झालेल्या या राज्यस्तरीय गझल संमेलनाला मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,खानदेश, कोकण अशा सर्व विभागातील गझलकार व गझल रसिकांचा प्रतिसाद मिळाला.बापू दासरी यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितीतांचे आभार अनिकेत सागर यांनी मानले.