Home Breaking News दखल एका कार्यक्रमाची ! चिमुकल्या स्पृहाने जिंकली श्रोत्यांची मने!

दखल एका कार्यक्रमाची ! चिमुकल्या स्पृहाने जिंकली श्रोत्यांची मने!

154

दखल एका कार्यक्रमाची !

चिमुकल्या स्पृहाने जिंकली श्रोत्यांची मने!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

प्रा.सुनंदा पाटील मुंबई विलेपार्ले मुंबई येथे झालेला स्वरांजलीचा, १५१ वा – गानकोकिळा लता हा कार्यक्रम अगदी उत्तम झाला . या कार्यक्रमात लताबाईंना , त्यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली वाहण्यात आली . कार्यक्रम नेटका , नेमका, नियोजित , वेळेवर सुरु झालेला आणि वेळेत संपलेला . यासाठी अर्थातच सर्व गायक कलावंतांचे हार्दिक अभिनंदन . आयोजक स्मृती मॅडमना विशेष धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा !!

एक थीम घेऊन कार्यक्रम करणे सोपे नसते . विषय होता ड्युएल गाणी. म्हणजे अशी गाणी की चित्रपटात तेच गीत लताबाईंनी आणि इतर कुणीतरी गायलंय ! सर्व गाण्यांची निवड उत्तम होती. सर्वांनी ताकदीने ती गाणी सादर केलीत . सर्वच गाणी अर्थातच जुनी होती. त्यावर कडी म्हणते स्मृती मॅडमचे अभ्यासपूर्ण आणि गोड आवाजातले सखोल सूत्रसंचालन . वाह! क्या बात है?

कार्यक्रमाची सुरुवात चि. स्पृहा सागर पाटील हिच्या ” श्री रामचंद्र कृपालू भजमन ” या गाण्याने झाली . या कार्यक्रमात इतर आठ कलावंत (सर्व मोठे) होते.

यानंतर स्पृहाने ” गोरे गोरे ओ बॉंके छोरे ” हे नटखट गीत तेवढयाच खट्याळपणे सादर केले. १९५० साली आलेल्या “समाधी ” चित्रपटातील ” सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीत अमीरबाई कर्नाटकी सोबत लताजींनी गायले होते. या गाण्यापासून तर पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या शेवटच्या गाण्या पर्यंतच्या आठवणी प्रत्येक गीताबरोबर जाग्या होत होत्या . यातली अनेक गाणी आमच्या पिढीने आपल्या तरुणपणात ऐकलीत .

पुढील गीत स्पृहाने मासूम चित्रपटातील ” तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हूँ मै ” अत्यंत ताकदीने पेश केले. शब्दांची फेक , गाण्यातील सहज भाव , आणि या छोट्याशा वयात अशा प्रकारच्या गाण्याची समज , सहज चढणारा उंच आवाज हे सर्व ऐकणे हा माझ्यासाठी / सर्व श्रोत्यांसाठी खूप आनंददायी क्षण होता . श्रोत्यांनी हे गाणं संपताच उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. “वन्स मोअर चा ” गजर झाला . पुन्हा ते गीत स्पृहाने सादर केले. तिला यावेळी बक्षिसेही मिळालीत .

आयोजक म्हणजे स्वतः स्मृती वेंगुलेकर मॅडमने यकीन चित्रपटातील ” गर तुम भुला न दोगे ” , झिलमिल सितारोंका आंगन होगा, मेरे नैना सावन भादो ही अप्रतिम गाणी अतिशय प्रभावीपणे सादर केलीत. स्मृती मॅडमचा तिन्ही सप्तकात सहज फिरणारा गोड आवाज याने श्रोत्यांवर खरंच जादू केली. याशिवाय डॉ. कुलकर्णी, प्रशांत , सुजाता , किरण, उमेश, राधिका यांनीही अनेक उत्तम गाणी सादर केली.

जुन्या गाण्यांचा पुनःप्रत्याचा आनंद आम्हा श्रोत्यांना सर्व गायकांनी दिला , त्यासाठी पुनश्च धन्यवाद !

लतादीदी आणि भारतीय संगीत हे अजोड नातं आहे. दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस , यातल्या प्रत्येक क्षणी लताबाईंचं गाणं विश्वात कुठेतरी वाजत असतं आणि कुणी ना कुणी ऐकत असतं . हा एकच जादुई आवाज आहे , जो प्रत्येक अभिनेत्रीच्या अभिनयासाठी ” आपला ” वाटतो. एकच उदाहरण देते. अमर अकबर अँथनी या चित्रपटासाठी “हमको तुमसे हो गया है प्यार ” या गाण्याचे गीतकार -आनंद बख्शी , संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल ! विनोद खन्ना , अमिताभ बच्चनजी , ऋषी कपूर यांच्याकरिता तीन वेगळे पुरूष गायक होते. किशोरदा , रफी साहेब , मुकेशजी ! मात्र शबानाजी , परवीन , नितू सिंग या तिघींसाठी एकच आवाज होता , तो म्हणजे लताबाईंचा . यातच बाईंचं मोठेपण कळतं . गेल्या ४ पिढ्यांना लताबाईंनी खूप दिलंय ! पुढेही हा स्वर्गीय आवाज असंच देत राहणार आहे.

पुनश्च सर्वांना धन्यवाद , अभिनंदन आणि शुभेच्छा!!
” अविस्मणीय , रमणीय, संगीतमयी सायंकाळ असेच या कार्यक्रमाचे वर्णन करावे लागेल. ” कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात दर्दी श्रोत्यांची उपस्थिती लाभली होती.