• अर्थमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या ठोस आश्वासनामुळे आझाद मैदानावरील आशा वर्कर , गटप्रवर्तकांच्या ठिय्या आंदोलनाला व संपास तूर्त स्थगिती
•कृति समितीचा एकमताने निर्णय !
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून दि. 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या दरम्यान संप केला. 1नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्यमंत्र्यांनी आशांच्या मोबदल्यात 7000 व गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात 6200 रुपये वाढ करण्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी भेटून गट प्रवर्तकांना सहा हजार दोनशे वरून दहा हजार वाढ करण्याचे घोषित झाले. सदरहु वाढीचा जीआर राज्य शासनाने 12 जानेवारी 2024 च्या अगोदर काढावा अन्यथा 12 जानेवारीपासून राज्यातील आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जातील, अशी नोटीस कृति समितीने राज्य शासनास दिली.परंतु कृति समितीने दिलेल्या मुदतीत शासनाने जीआर न काढल्यामुळे नाईलाजाने कृती समितीने संप पुकारला.दरम्यान दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी शहापुर ते ठाणे पदयात्रा काढुन 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे 20 हजार आशा व गटप्रवर्तकांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जी. आर.काढण्यासाठी त्यांना साकडे घातले. दि.9 व 10 तारखेला दोन दिवस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ठाणे येथे रस्त्यावर आंदोलन केले. जीआर काढण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तेथून आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे स्थलांतरीत करून दि.11 फेब्रवारी ते 1 मार्च 2024 पर्यंत तब्बल 20 दिवस आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन केले.ठाणे व मुंबई असे एकूण 22 दिवस ठिय्या आंदोलन व सुमारे 50 दिवस संप करुन सरकारचे राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी शासनाचे लक्ष वेधले.
तीव्र व सलग चिकाटीच्या लढ्यामुळे सरकारवर निश्चितच दबाव निर्माण झाला. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी आशा व गट प्रवर्तकांना मानधनात वाढ करण्याचे जाहीर व ठोस आश्वासन दिले.
येत्या 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्यात राबवली जात असल्यामुळे सध्या प्रचंड दडपशाही आशा व गटप्रवर्तकांवर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने 368 आशांना कार्यमुक्त केले आहे. तसेच अंबरनाथ तालुक्यातील खुंटवली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण आशांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्याचे आदेश काल काढले आहेत. या धर्तीवर राज्यातील सर्वच आशा व गटप्रवर्तकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्यभर निघत असल्यामुळे बहुतांश आशा व गटप्रवर्तकांचा कल कामावर रुजू होण्याचा दिसून आला ही बाब कृती समितीच्या लक्षात आली. मागण्या तर मंजूर झाल्याच पाहिजेत, परंतु त्यासोबत सभासदांचा रोजगारही वाचला पाहिजे. त्यामुळे कृति समितीने काल सायंकाळी 7.30 वाजता एक तातडीची बैठक घेवुन सर्वानुमते आझाद मैदान मुंबई येथील ठिय्या आंदोलन व संप तुर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनींना आवाहन करण्यात येते की, उद्या दि.2 मार्च 2024 पासून आपापल्या नित्याच्या कामाला सुरुवात करावी व पल्स पोलिओ लसिकण मोहीमेत सहभाग घ्यावा.
मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडून जाहीर ठोस आश्वासन मिळवण्यासाठी कृती समितीला माजी आमदार जे. पी गावित, आ.विनोद निकोले, डॉ .डी एल कराड यांनी सहकार्य केल्याबद्दल कृती समिती त्यांचे आभार मानले आहेत.
आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन स्थळी येवुन आ.विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधान सभा आ.अंबादास दानवे विरोधीपक्षनेते विधान परिषद,आ.बाळासाहेब थोरात ,आ.रोहित पवार,सिटू राज्य सरचिटणीस कॉ. एम. एच. शेख, आयटक राज्य सरचिटणीस कॉ.श्याम काळे व विविध पक्षाचे आमदार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी येऊन जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही कृती समिती आभार व्यक्त केले आहे.विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवळ यांनीही कृती समितीच्या अधिकाऱ्यांसोबत भेटी घडवून आणल्याबद्दल त्यांचे ही कृती समितीने आभार व्यक्त केले आहे.
आपण लढाई हरलो नाहीत. कृती समिती जीआर काढण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जीआर काढूनच घेणार आहे. याबद्दल कृती समिती वचनबद्ध आहे. आपण संप व आंदोलन मागे घेतले नसून तुर्त स्थगित केले आहे. आपण शासनाला जीआर काढण्यासाठी वेळ देत आहोत. आशा व गटप्रवर्तकांच्या विश्वासास अजिबात तडा कृती समिती जाऊ देणार नाही. तुमच्या हक्काच्या व रास्त मागण्यासाठी कृती समिती वचनबद्ध व कटीबध्द आहे.
राज्यभर संप काळात आशा व गटप्रवर्तकांवर केलेली कारवाई त्वरीत मागे घ्यावी. तसेच संप काळातला आशा व गटप्रवर्तकाचे वेतन कपात करू नये, अशी मागणी कृती समिती शासनाकडे करीत आहेत .
कृती समितीचे निर्णय परस्पर हजर नसतांना जाहिर करणे, चुकीची माहिती पसरवणे , परस्पर निर्णय घेणे, यामुळे कृती समितीतून काही पदाधिका-यांना काढून टाकल्याचे समजते.काल झालेल्या कृती समितीच्या निर्णयाक बैठकीत विनोद झोडगे, डॉ. डी .एल .कराड, माजी आमदार जे पी गावित, दत्ता देशमुख , सचिन आंधळे, निलेश दातखिळे, पुष्पा पाटील, आनंदी अवघडे, उज्वला पाटील, आरमायटी इराणी, व उज्वला पडलवार यांचा सहभाग होता.