Home Breaking News chandrapur city@ news •दीक्षाभूमीचा होणार लवकरच दैदिप्यमान विकास ! •आ. किशोर जोरगेवारांच्या...

chandrapur city@ news •दीक्षाभूमीचा होणार लवकरच दैदिप्यमान विकास ! •आ. किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नाला यश 56 कोटी 90 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मिळाली सामाजिक न्याय विभागाची अंतिम मंजुरी

72

chandrapur city@ news
•दीक्षाभूमीचा होणार लवकरच दैदिप्यमान विकास !
•आ. किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नाला यश
56 कोटी 90 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मिळाली सामाजिक न्याय विभागाची अंतिम मंजुरी

चंद्रपूर: किरण घाटे

चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, दीक्षाभूमीच्या 56 कोटी 90 लाख रुपयांच्या आराखड्याला सामाजिक न्याय विभागाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. परिणामी, येथील विकास कामाला लवकरच सुरुवात होणार असून दीक्षाभूमीचा दैदिप्यमान विकास होणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झाला आहे, मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली होती. येथे देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत होती. या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार जोरगेवार प्रयत्नशील होते.
आमदार जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सदरहु मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यांनी दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. सत्ता परिवर्तनानंतर, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती.
त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दीक्षाभूमी विकासासाठी उच्चाधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करत, तो वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव उच्च स्तरीय शिखर समितीने मंजूर करून वित्त व नियोजन विभागाकडे पाठविले होते. वित्त व नियोजन विभागाने मंजुरी दिल्यांनंतर सामाजिक न्याय विभागानेही सदरहु प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, दीक्षाभूमीच्या विकासाची नवी दिशा ठरवली जाणार आहे.
या निधीतून येथे 65 फुट उंचीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा तयार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे, सुरक्षा भिंत, बुद्धविहार, परिसर सौंदर्यीकरण, भव्य वाहनतळ व्यवस्था, सभामंडप यासह इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहेत.