
#Varora
• लोकनेते स्व. संजय देवतळे यांच्या स्मृतीदिना निमित्त नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,चंद्रपूर
वरोरा : महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री स्व. संजय देवतळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त येत्या शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच आयुष्यमान कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धीविनायक मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन रोड, वरोरा येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
स्व. संजय देवतळे हे मनमिळावू, समाजहितासाठी सतत झटणारे आणि नेहमी मदतीला धावून जाणारे लोकनेते होते. त्यांच्या स्मृती जपत त्यांच्या कार्यास सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा उपक्रम असून, या स्मरण सोहळ्याचे उद्घाटन मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य ना. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. डॉ. अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास व पालकमंत्री, चंद्रपूर हे राहणार असून प्रमुख उपस्थितीत हंसराज अहीर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग), सुधीर मुनगंटीवार (आमदार तथा माजी मंत्री), बंटीभाऊ भांगडीया (आमदार, चिमूर), किशोर जोरगेवार (आमदार, चंद्रपूर), देवराव भोंगळे (आमदार, राजुरा), सुभाष धोटे (माजी आमदार, राजुरा) व प्रकाशचंद मुथा (माजी सभापती, जि.प. चंद्रपूर) उपस्थित राहणार
हा कार्यक्रम आमदार करण संजय देवतळे आणि स्व. संजय देवतळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून स्व. देवतळे यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.