#Bhadravti
• विवेकानंद विद्यालयाचा सामूहिक नृत्य स्पर्धेत डंका
• शालेय गटात प्रथम क्रमांक, ₹५५५५ चे पारितोषिक प्राप्त
सुवर्ण भारत: राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती : पत्रकार दिनानिमित्त भांदक प्रेस क्लब, भद्रावती यांच्या वतीने दिनांक ६ जानेवारी रोजी शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत शालेय गटात प्रथम क्रमांक पटकावला.
विविध शाळांतील स्पर्धकांमध्ये चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाच्या चमूने ताल, लय आणि सादरीकरणातील शिस्त यांमुळे परीक्षकांची विशेष दाद मिळवली.
या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, वरोरा संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.
या यशात शिक्षकवृंद सौ. आशा गावंडे, तुकाराम पोफळे, संजय आगलावे व सौ. मेघा ताजने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, दिनांक १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विजेत्या चमूला ₹५५५५ रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दयाकर मग्गीडवार व चमूची कर्णधार कु. मीरा अरुण गुप्ता यांनी पारितोषिक स्वीकारले.
या कार्यक्रमास अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे, प्रा. डॉ. बरडे, पत्रकार सुधीर पारधी, नगरसेवक फैय्याज शेख, नगरसेविका सौ. वृषाली पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





