Home Breaking News नांदगाव (पोडे) येथे गुन्हेगारीचा आलेख उंचावला; अवैध धंदे व चाकूहल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभयीत!...

नांदगाव (पोडे) येथे गुन्हेगारीचा आलेख उंचावला; अवैध धंदे व चाकूहल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभयीत! ग्रामपंचायतीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी

134
Oplus_131072

नांदगाव (पोडे) येथे गुन्हेगारीचा आलेख उंचावला; अवैध धंदे व चाकूहल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभयीत!

ग्रामपंचायतीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम(प्रतिनिधी, बल्लारपूर)

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे, चाकूहल्ले, लुटमार आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे गावचे सामाजिक वातावरण आणि शांतता पूर्णपणे धोक्यात आली असून, गुन्हेगारांवर तात्काळ आवर घालण्यात यावा, या मागणीसाठी नांदगाव (पोडे) ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांना नुकतेच एक निवेदन सादर करण्यात आले.
सुमारे ८ हजार लोकसंख्या असलेल्या नांदगाव (पोडे) गावाचा परिसर सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे. गावात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे दारुड्यांचे प्रमाण वाढले असून, रोज कुठे ना कुठे भांडणे, वादविवाद आणि हाणामाऱ्यांचे प्रकार घडत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे महिला, लहान मुले आणि सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी आणि पादचारी त्रस्त!
काही समाजकंटकांकडून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना विनाकारण त्रास देणे, वाहनधारकांना अडवून लुटमार करणे आणि दिवसाढवळ्या चाकूहल्ले करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. एवढेच नव्हे तर, शेतकरी वर्गालाही याचा मोठा फटका बसत असून, शेतातून शेती उपयोगी महागडी अवजारे आणि साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.

“गावातील शांतता आणि महिलांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. सध्याची परिस्थिती पाहता सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन गावात चोवीस तास गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांना तात्काळ गजाआड करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
ग्रामपंचायत  सदस्य नांदगाव

अवैध व्यवसायांना तात्काळ कुलूप ठोकून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. आता या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण बल्लारपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.