माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सुखावला लोकशिक्षण संस्थेचा परिसर !
लोकशिक्षण संस्थेच्या देश विदेशातील माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
वरोरा : लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, संस्थेच्या लोकमान्य माजी विद्यार्थी संस्था व लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात, रविवारी करण्यात आले होते.
उदघाटन समारंभाला लोकमान्य विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद शिरभय्ये आणि माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक वसंत महाजन (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील, प्राचार्य राहुल राखे, माजी विद्यार्थी संस्थेचे संयोजक अनिल नानोटकर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप
प्रज्वलन आणि अमृत महोत्सवी गीताने झाली.
कार्यक्रमात लोकमान्य कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी समूहनृत्य आणि लोकमान्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी समूहगीत सादर केले.
या प्रसंगी संस्थेची वाटचाल दर्शवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. प्रास्ताविक प्रा. अनिल नानोटकर यांनी केले.आनंद शिरभय्ये व वसंत महाजन यांनी आर्शिवादपर मनोगत व्यक्त केले.
उदघाटन सत्रात संस्थेचे माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी, गुणवत्ता प्राप्त माजी विद्यार्थी तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य प्राप्त माजी खेळाडूंचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्राचे संचालन डॉ. प्रशांत खुळे, उमेश लाभे, स्मिता बोंडे यांनी संयुक्तपणे केले. वंदे मातरम् ने या सत्राची सांगता झाली.
दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत माजी विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य, अभिनय, एकपात्री प्रयोग, तत्कालीन शालेय अभ्यासक्रमातील कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.या सत्राचे संचालन डॉ. प्रशांत खुळे व ऋणनिर्देश प्राचार्य राहुल राखे यांनी केले.
सकाळी ९.३० ते दुपारी ५ वाजे पर्यंत चाललेल्या या मेळाव्यात जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अनेक वर्षांनी भेटल्याचा अनिर्वचनीय आनंद माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. संस्थेच्या परिसरात प्रदर्शित केलेले दिवंगत शिक्षक व कर्मचारी यांना अभिवादन करणारे श्रद्धांजलीचे बॅनर तसेच गुणवंत, यशस्वी खेळाडूंचे फोटो असलेले बॅनर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.१९९७ च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी बँड पथकासोबत फेटे घालून केलेली एन्ट्री व २००३ च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी परिधान केलेले आकर्षक टी शर्ट वेधक ठरले. यावर्षी. आयोजित झालेला हा चौथा मेळावा होता, हे उल्लेखनीय.
फोटो… संस्थेचे माजी विद्यार्थी मान्यवरांचा सत्कार करताना





