Home Breaking News शब्दस्वरांच्या चांदण्यात रंगलेला “सहज सुचलं”चा संवाद सोहळा 

शब्दस्वरांच्या चांदण्यात रंगलेला “सहज सुचलं”चा संवाद सोहळा 

148

शब्दस्वरांच्या चांदण्यात रंगलेला “सहज सुचलं”चा संवाद सोहळा 

चंद्रपूर : किरण साळवी

विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रभूमीतील साहित्य आणि स्नेहाचा सुगंध दरवळणाऱ्या

‘सहज सुचलं’ या नामवंत समूहाची ऑनलाईन सभा नुकतीच अत्यंत दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाली.

या सभेने केवळ विचारांची देवाणघेवाणच केली नाही, तर स्नेहबंधांना अधिक घट्ट विणण्याचे कार्य केले.

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणाऱ्या आवाजाप्रमाणे या सभेत महाराष्ट्रातील अनेक प्रज्ञावंत आणि मान्यवर महिलांचा सक्रिय सहभाग लाभला. सभेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे समूहाच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांचे ओजस्वी मार्गदर्शन! त्यांनी आपल्या प्रगल्भ विचारांनी सभेला दिशा दिली. समूहाची कार्यकक्षा अधिक रुंदावण्यासाठी आणि संवाद सातत्यपूर्ण राहण्यासाठी त्यांनी ‘प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी’ अशीच ऑनलाईन सभा घेण्याची मोलाची सूचना या वेळी मांडली. त्यांच्या या सूचनेला ‘सहज सुचलं’च्या सर्वच शिलेदारांनी, पदाधिकारी आणि सदस्यांनी एका सुरात आणि हर्षाने संमती दर्शविली.हे विशेष!

या संपूर्ण सोहळ्याचे सारथ्य आणि नियोजनाचा पुढाकार जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांनी अत्यंत कुशलतेने पेलला. त्यांच्या पुढाकारामुळेच विखुरलेले मणी एका माळेत गुंफल्यासारखे सर्व सदस्य या आभासी पटलावर एकत्र आले. सभेचे खरे शिल्पकार ठरले ते म्हणजे उपस्थित असलेले प्रत्येक सदस्य, ज्यांनी आपल्या उपस्थितीने या सभेला चैतन्य प्राप्त करून दिले. सभेच्या ओघात प्रत्येकाने आपला परिचय देत मनातील भावनांना वाट करून दिली.

केवळ चर्चा नको तर कृती हवी, या उदात्त हेतूने जेष्ठ लेखिका प्रा.वैशाली राऊत यांनी मांडलेला उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला. या उपक्रमाच्या रूपाने समूहाच्या कार्याला एक नवी झळाळी मिळणार आहे. मायाताई कोसरे यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विजयाताई तत्वादी यांच्या कर्तृत्वाचा आणि जिद्दीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. विजयाताईंचा या वयातील तो उत्साह, त्यांचा तो कणखर आणि आश्वासक आवाज अन् बोलण्याची अमोघ शैली पाहून उपस्थित प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला. “त्यांचा आदर्श समोर असताना आपण मागे का राहावे?” हा मायाताई कोसरे यांचा प्रश्न प्रत्येक सदस्याला नवी ऊर्जा देऊन गेला.

अर्ध्या तासाच्या या छोटेखानी पण परिणामकारक सभेत कोसरे यांनी सर्वांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले. जे सदस्य काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. मात्र, येणाऱ्या काळात नवनवीन उपक्रम आणि विचारांची शिदोरी घेऊन अधिकाधिक नवोदित सदस्यांनी या प्रवाहात सामील व्हावे, अशी साद या सभेतून घालण्यात आली.

अशा प्रकारे, आदरातिथ्य, आपुलकी आणि साहित्याची ओढ असलेल्या या ऑनलाईन भेटीची सांगता झाली. आता सर्वांना वेध लागले आहेत ते पुढच्या महिन्यातील पहिल्या रविवारचे, जेव्हा पुन्हा एकदा विचारांचे अमृत मंथन होईल आणि ‘सहज सुचलं’चा हा वेलू गगनाला भिडण्यासाठी सज्ज होईल. नव्या उमेदीने आणि नव्या संकल्पनांनी हा समूह भविष्यात नक्कीच मोठी झेप घेईल, असा विश्वास या यशस्वी सभेतून व्यक्त झाला.

आयोजित सभेत प्रामुख्याने मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते, प्रा.राजश्री पाटील, विजयाताई तत्वादी, कवयित्री मंगल मिसाळ , प्रविणा वाघाडे व अन्य सदस्यांनी घेतला.

◼️प्रथमच आयोजित सभा !

———————————————

प्रथमच आयोजित ही आँनलाईन सभा ठाण्याच्या मंगल मिसाळ यांच्या माध्यमातून पार पडली.त्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले .