एक प्रगल्भ चित्रकार साक्षी लक्ष्मण वाडगुरे !
रांगोळीच्या माध्यमातून उमटविला किनवटच्या प्रतिभेचा ठसा
चंद्रपूर : किरण घाटे

कलेच्या प्रांगणात जेव्हा कल्पकता आणि परिश्रमाचा मणिकांचन योग घडून येतो, तेव्हा साध्या रंगकणांनाही जिवंतपणाची वाचा फुटते, याचा प्रत्यय किनवटच्या सुभाषनगरची सुकन्या आणि प्रख्यात चित्रकार कु. साक्षी लक्ष्मण वाडगुरे हिच्या कलाकृतींकडे पाहताना येतो. बालपणापासूनच चित्रकलेची अमाप ओढ आणि रंगांशी असलेली घट्ट मैत्री साक्षीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली आहे. तिने केवळ रंगांची उधळण केली नाही, तर आपल्या प्रतिभेने पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर आणि जमिनीवर जिवंत स्पंदने निर्माण केली आहेत. बी.एस्सी, बी.ए. आणि एटीडी अशा उच्च शिक्षणाची सांगड घालत तिने चित्रकला आणि रांगोळी या दोन्ही क्षेत्रांत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. सध्या ‘साई आर्ट इन्स्टिट्यूट’ आणि ‘महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, किनवट’ येथे कलाशिक्षिका म्हणून कार्यरत असताना, ती केवळ विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवत नाही, तर त्यांच्या मनात नवनिर्मितीची स्वप्नेही पेरण्याचे पवित्र कार्य करत आहे.
साक्षीने आपल्या बोटांच्या किमयेने रेखाटलेली हजारो हुबेहूब आणि मनाला भुरळ घालणारी चित्रे आज रसिकांच्या पसंतीची दाद मिळवत आहेत.
मध्यंतरी साक्षीने किनवट नगरीत एक प्रदर्शन भरविले होते.तिच्या प्रदर्शनाला अनेकांनी भेट दिली होती.
तिची ही कला पाहून अनेक मान्यवरांनी तिचे तोंडभरून कौतुक केले असून, विविध स्तरांवरील पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे. ‘सहज सुचलं’ सारख्या प्रतिष्ठित समूहाच्या माध्यमातून तिची ही कला घराघरांत पोहोचत असून, ज्येष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे , अधिवक्ता मेघा धोटे आणि किरण साळवी यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी तिच्या कलेला आश्वासक दाद दिली आहे. रंगांच्या या अद्भुत दुनियेत साक्षीची ही अविरत साधना अशीच बहरत राहो आणि तिच्या कलेतून भविष्यात अनेक अजरामर कलाकृती साकार व्हाव्यात, हीच रसिक मनाची सदिच्छा! एका ध्येयवेड्या कलाकाराचा हा प्रवास खऱ्या अर्थाने उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
भविष्यात किनवट शहरात भव्य चित्र प्रदर्शन भरविण्याचा साक्षी वाडगूरेचा मानस आहे.



