लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचा ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम; मुरसा व
बेलसणी येथे प्रवाशांसाठी नवीन बसस्टँडचे लोकार्पण
मुरसा : ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे मुरसा व बेलसणी येथील मुख्य रस्त्यावर प्रवाशांसाठी सुसज्ज बसस्टँडचे बांधकाम करण्यात आले असून या बसस्टँडचे लोकार्पण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, महिला नागरिकांना तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हाळा, पाऊस व इतर प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
या बसस्टँडचे लोकार्पण लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ महाप्रबंधक माननीय डॉ. कौशिक घोष, सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विध्या पाल तसेच लॉयड्स स्किल सेंटरचे उपमहाप्रबंधक माननीय अखिलेश कर्ण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला बेलसणीच्या सरपंच सौ. इंदिरा पोळे व मुरसा येथील उपसरपंच श्री. सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागात मूलभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित करत लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. “ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. बसची प्रतीक्षा करताना नागरिकांना उन्हात किंवा पावसात उभे राहावे लागते. अशा परिस्थितीत या बसस्टँडमुळे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विशेषतः शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या बसस्टँडचा मोठा फायदा होणार आहे. अनेक विद्यार्थी दररोज बसची प्रतीक्षा करताना उन्हात उभे राहत होते. आता या नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्टँडमुळे त्यांना सुरक्षित व संरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही या सुविधेमुळे मोठा लाभ होणार आहे.
ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या बसस्टँडमुळे परिसरातील नागरिकांची प्रवास सुविधा अधिक सुलभ व सुरक्षित होणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे यापूर्वीही आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण तसेच पायाभूत सुविधा विकासाशी संबंधित विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशा लोकहितकारी उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बसस्टँडच्या उभारणीसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे मुरसा व बेलसणी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.



