• भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक भयभीत
• प्रभाग क्रमांक १० मधील समस्येवर तात्काळ कारवाईची मागणी

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक )
बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूर अंतर्गत प्रभाग क्रमांक १० मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रोज रस्त्याने ये-जा करणारे नागरिक भटक्या कुत्र्यांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. अनेकदा कुत्रे नागरिकांच्या मागे धावणे, भुंकणे तसेच हल्ला करण्याच्या घटनाही घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले की, या समस्येबाबत यापूर्वीही अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच समस्या त्वरित मार्गी न लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक सुमित (गोलू) डोहणे यांच्यासह शाहिद शेख, रितेश अलोने, शुभम लभाने आदी उपस्थित होते.




