Home Breaking News वरोऱ्यात मध्यरात्री घडली भीषण घटना कुटुंबाचे उदर निर्वाह करणारे साधन ‘ऑटो ‘...

वरोऱ्यात मध्यरात्री घडली भीषण घटना कुटुंबाचे उदर निर्वाह करणारे साधन ‘ऑटो ‘ भक्ष्यस्थानी अभ्यंकर वॉर्डातील घटना

9

वरोऱ्यात मध्यरात्री घडली भीषण घटना कुटुंबाचे उदर निर्वाह करणारे साधन ‘ऑटो ‘ भक्ष्यस्थानी

अभ्यंकर वॉर्डातील घटना

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर 

वरोरा :-शहरातील बोबडे लेआउट, अभ्यंकर वार्ड परिसरात १४ मे चे मध्यरात्री एक भीषण घटना घडली.

अभ्यंकर वॉर्डातील रहिवासी किशोर वासूदेव राऊत यांच्या मालकीच्या पेट्रोल+सीएनजी थ्री-व्हीलर ऑटोला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने पहाता – पहाता संपूर्ण ऑटो जळून खाक झाला. सुदैवाने सदर घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी राऊत यांचे मोठे नुकसान झाले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाह चे साधनच आगीने आपल्या कवेत घेतले.त्यामुळे कुटुंबप्रमुखासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला

प्राप्त माहितीनुसार, किशोर राऊत यांचा MH 34 BH 4171 क्रमांकाचा ऑटोने रात्री उभा असताना मध्यरात्री अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की पाहता पाहता ऑटोचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सदर प्रवासी ऑटो सीएनजी किटवर आधारित असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, निसर्गाची कृपा म्हणा किंवा दैवाचा हात, भीषण आगीतही सीएनजी टँक सुरक्षित राहिला. टँकचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांना आणि नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भरवस्तीत लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की घातपात? या दिशेने आता चर्चांना उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपासयंत्रणा कामाला लागली आहे.

“माझ्या उदरनिर्वाहाचे साधन डोळ्यादेखत जळून खाक झाले,” अशी भावना मालक किशोर राऊत यांनी व्यक्त केली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.