भोवळ येऊन पडल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली; विसापूरमध्ये शोककळा
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम (प्रतिनिधी, बल्लारपूर)

विसापूर : येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील रहिवासी राहुल विठ्ठल दानव ( ३२) या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दानव हे दिनांक २५ मे रोजी भद्रावती तालुक्यातील पाऊणा गाव येथे वडिलोपार्जित शेतीच्या हिस्से वाटणीच्या कामानिमित्त आई सोबत गेले होते. दरम्यान, तेथील एका पानठेल्यावर असताना त्यांना अचानक भोवळ आली व ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच दिनांक २७ मे रोजी सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर विसापूर येथील स्मशानभूमीत गुरुवारला दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक बहीण, एक भाऊ, वहिनी व पुतणे असा आप्तपरिवार आहे. राहुल दानव यांच्या अकाली निधनाने विसापूर परिसरात शोककळा पसरली आहे.




