मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाला पुन्हा नवे वळण!
गर्भपात प्रकरणातील आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपी डॉ. विश्वास फरार, पोलिसांचा शोध सुरू
तालूका – प्रतिनिधी
वरोरा : – वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा (वडगाव) परिसरात २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मयुरी हरिदास सुपारे यांच्या आत्महत्या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासात शेगाव पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढवत गुन्ह्यात आणखी एक कलम समाविष्ट केले असून, मृत महिलेच्या पतीचे काका व काकू यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.
दरम्यान, अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी डॉ. विश्वास अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली असून, तो लवकरच जेरबंद होईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर येत असल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मयुरी सुपारे या जिवंत असताना त्यांच्या वडिलांनी आणि भावाने जून महिन्यात गिरड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना परत पाठविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
स्थानिकांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, संबंधित तक्रारीची वेळीच दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली असती, तर कदाचित मयुरी सुपारे यांचे प्राण तसेच त्यांच्या पोटातील गर्भ वाचू शकला असता. या पार्श्वभूमीवर गिरड पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात निष्काळजीपणा झाला का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, शेगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, फरार आरोपी डॉ. विश्वास याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








