चंद्रपुरात पोलिसांची धडक कारवाई: सराईत दुचाकी चोर जाळ्यात; २ लाख ३० हजारांच्या ४ मोटारसायकली हस्तगत, ५ गुन्हे उघडकीस
सुवर्ण भारत : शंकर महाकाली

चंद्रपूर:शहरात आणि परिसरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका रेकॉर्डवरील सराईत दुचाकी चोराला जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूरसह नागपूर परिसरातील तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्रतिक धनराज झाडे (वय ३३, रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
अशी झाली कारवाई:
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्त घालीत असताना व गोपनीय माहिती गोळा करत असताना, संशयित आरोपी प्रतिक झाडे हा पोलिसांच्या नजरेत आला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे एक टीव्हीएस (TVS) कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-34-BU-5217) आढळली. ही गाडी पडोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे नोंदवहीतील कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीच्या माहितीवरून मुद्देमाल हस्तगत:
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने इतर गुन्ह्यांची व लपवून ठेवलेल्या गाड्यांची माहिती दिली. त्यानुसार दूध डेअरी कॉलनी, चंद्रपूर येथील झाडी-जंगलातून व इतर ठिकाणांहून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
१. टीव्हीएस मोटारसायकल (क्र. MH-34-BU-5217): किंमत ₹४०,०००/- (पोलीस स्टेशन पडोली, अपराध क्र. २९१/२०२६)
२. होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. MH-34-CA-4413): किंमत ₹५०,०००/- (पोलीस स्टेशन रामनगर, अपराध क्र. ७३९/२०२६)
३. होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. MH-31-FL-7928): किंमत ₹८०,०००/- (पोलीस स्टेशन बर्डी, जि. नागपूर, अपराध क्र. ५०६/२०२६)
४. हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH-34-AG-6839): किंमत ₹६०,०००/-
तसेच, आरोपीने पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील अपराध क्र. ८४३/२०२६ मधील चोरीची पॅशन प्रो मोटारसायकल माणिकगड, राजुरा परिसरामध्ये बेवारस सोडल्याची कबुली दिली असून, सदर मोटारसायकल यापूर्वीच पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत एकूण ०४ दुचाकी (किंमत ₹२,३०,०००/-) हस्तगत करण्यात आल्या असून, एकूण ०५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुढील तपास सुरू:
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कारवाई व सखोल तपासासाठी पोलीस स्टेशन पडोली, जि. चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग चंद्रपूर पथकाने पार पाडली असून, या कारवाईमुळे वाहन चोरांचे धाबे दणाणले आहेत.






